Join us  

२०१९ मध्ये मतदारयादीत नावच नव्हतं; Rahul Dravid चं लोकसभेसाठी १० वर्षांनंतर मतदान, साधेपणानं जिंकली मनं

Rahul Dravid voting, Lok Sabha Election 2024: राहुल द्रविडने बंगळुरूमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्याचा साधेपणा सर्वांनाच भावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 6:03 PM

Open in App

Rahul Dravid voting, Lok Sabha Election 2024: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा आपल्या साधेपणामुळे कायम चर्चेत असतो. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर असो, राहुल द्रविड कायमच शांत, संयमी स्वभावामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. कसलाही बडेजाव न मिरवणाऱ्या राहुल द्रविडने आज पुन्हा एकदा आपल्या साधेपणाने सर्वांची मने जिंकली. आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होते. मतदानाच्या वेळी राहुल द्रविडने केलेल्या काही गोष्टी सामान्य नागरिकांना भावल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, २०१९च्या लोकसभा मतदानाच्या वेळी तो ब्रँड अँबेसेडर असूनही द्रविडचे नाव मतदार यादीतून गहाळ झाले होते. त्यामुळे त्याला तब्बल १० वर्षांनी मतदान करण्याची संधी मिळाली.

आज १३ राज्यांतील ८८ मतदारसंघातील जागांसाठी मतदान झाले. या मतदारसंघामध्ये बंगळुरू मतदारसंघाचाही समावेश होता. बंगळुरूच्या मतदारसंघात द्रविड मतदाता आहे. बंगळुरू नॉर्थच्या डॉलर कॉलनीमध्ये असलेल्या मतदान केंद्रात द्रविडने आपला मतदानाचा हक्क बजावला. द्रविड स्वत: कार ड्राइव्ह करून मतदान केंद्रावर पोहोचला. कार पार्क करून तो उतरला आणि इतर नागरिकांप्रमाणे रांगेत उभा राहून आपला नंबर येण्याची वाट पाहून लागला. VIP असल्याचा कुठलाही बडेजाव न मिरवता द्रविडने आपला नंबर आल्यावर आत जाऊन मतदान केले. त्याचा हाच साधेपणा उपस्थितांना भावला.

ब्रँड ॲम्बेसेडर पण मतदानच करता आले नाही!

2019च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या निवडणूक आयोगाने राहुल द्रविडला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले होते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी द्रविडला ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले होते, परंतु त्याचे स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रविडने इंदिरानगरमधील आपले वडिलोपार्जित घर सोडले आणि उत्तर बंगळुरूच्या उपनगरात शिफ्ट झाला. त्याचा भाऊ विजय याने त्याच्या जुन्या पत्त्याच्या मतदार यादीतून त्याचे नाव काढून टाकले, मात्र नवीन पत्त्यावर गेल्यानंतर राहुलने आपले नाव मतदार यादीत नोंदवले नाही. त्यामुळे तेव्हा नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले होते. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४राहुल द्रविडमतदानबंगलोर उत्तर