Join us  

जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास राहुल द्रविडच्या NCAचा नकार

सप्टेंबर महिन्यात बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली होती. त्यानंतर त्याला तीन मालिकांना मुकावे लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 5:32 PM

Open in App

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरत आहे. तो भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) बुमराहच्या तंदुरुस्तीची चाचणी होणे अपेक्षित होते. पण, राहुल द्रविड अध्यक्ष असलेल्या NCAनं 26 वर्षीय बुमराहची तंदुरुस्त चाचणी घेण्यास नकार दिला आहे. सप्टेंबर महिन्यात बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली होती. त्यानंतर त्याला तीन मालिकांना मुकावे लागले आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार द्रविड आणि त्याच्या NCA मधील टीमनं विनम्रपणे बुमराहची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास नकार दिला. NCAला बुमराहची चाचणी घेणे पटत नाही. ज्यावेळी बुमराहला दुखापत झाली तेव्हा त्यानं NCA कडे न येता वैयक्तिक स्पेशालिस्टकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडून उपचार घेतले. बुमराह उपचारासाठी इंग्लंडमध्ये गेला होता आणि त्यानंतर तो वैयक्तिक फिजिओकडून तंदुरुस्तीचे धडे गिरवत आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी बुमराहनं नेटमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांना गोलंदाजी केली होती. तेव्हा तो बरा झाल्याचे जाणवल्याचे टीम इंडियाच्या व्यवस्थापकीय समितीतील सदस्यानं सांगितले. पण, द्रविडनं तंदुरुस्ती चाचणी घेण्यास नकार दिला आहे. वृत्तानुसार, बुमराहच्या दुखापतीची माहिती NCA ला नाही. त्यानं सर्व उपचार वैयक्तिकरीत्या केले आहेत. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबत त्यानं त्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. NCAनं तंदुरुस्ती चाचणी घेतल्यास आणि भविष्यात त्याला काही समस्या जाणवल्यास NCA वर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास द्रविडचा नकार असल्याचे समजते.

गांगुली करणार द्रविडशी चर्चादरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यासंदर्भात द्रविडशी चर्चा करणार आहेत. ते म्हणाले,''यामागे नक्की काय कारण आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. NCAनं सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्राधान्य दिले पाहिजे. मी द्रविडची भेट घेईन आणि योग्य तो तोडगा काढीन.''

टॅग्स :जसप्रित बुमराहराहूल द्रविडबीसीसीआयसौरभ गांगुली