Rahul Dravid Injured Rajasthan Royals : IPL 2025 सुरू होण्यासाठी आता अवघे १० दिवस शिल्लक आहेत. त्याआधी सर्वच संघ आपल्या खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष देत आहेत. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आणि लखनौ सुपर जायंट्सचा मयंक यादव यांना दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार असल्याची मिळाली आहे. खेळाडूंच्या दुखापतींबाबत चर्चा सुरु असताना राजस्थान रॉयल्सचा संघात मात्र वेगळीच गोष्ट घडली आहे. त्यांच्या संंघाचा खेळाडू नव्हे तर थेट मुख्य प्रशिक्षकच जायबंदी झाले आहेत. राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी राहुल द्रविडवर सोपवण्यात आली आहे. पण त्याआधीच एका किरकोळ दुर्घटनेमुळे राहुल द्रविड जखमी झाला आहे आणि त्याच्या पायावर प्लास्टर चढवण्यात आले आहे.
द्रविडला नेमकं काय झालं?
राजस्थान रॉयल्सने द्रविडचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झालेली दिसते. राजस्थान रॉयल्सने म्हटले आहे की द्रविडला क्रिकेट खेळताना दुखापत झाली आहे. राहुल द्रविडच्या दुखापतीबद्दल माहिती देताना राजस्थान रॉयल्सने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना त्याला दुखापत झाली आहे. राहुल द्रविड शक्य तितक्या लवकर तंदुरूस्त होण्याचा प्रयत्न करत आहे. तो बुधवारी जयपूरमध्ये येऊन संघाच्या ताफ्यात सामील होईल.
दरम्यान, गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने चांगला खेळ केला होता. हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता पण अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. यावेळी राजस्थानला आशा आहे की द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संघ अधिक चांगली कामगिरी करेल. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सने आयपीएल जिंकले होते, त्यानंतर त्यांना विजेतेपद मिळालेले नाही. तशातच, यंदा IPL इतिहासातील सर्वात तरुण म्हणजेच १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशीदेखील या संघाकडून खेळणार आहे.