Join us  

रवी शास्त्री यांना राहुल द्रविडचाही तिटकारा?, सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या तापलेले मुद्दे आहेत. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शास्त्री आणि त्यांच्या साहाय्यक कर्मचारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 10:51 AM

Open in App

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या तापलेले मुद्दे आहेत. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शास्त्री आणि त्यांच्या साहाय्यक कर्मचारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केलेल्या गौप्यस्फोटानंतर शास्त्री यांच्यावरील नाराजी अधिक वाढणारी आहे. ''क्रिकेट सल्लागार समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) यांनी संघाचा फलंदाज सल्लागार म्हणून राहुल द्रविडच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र,शास्त्री यांच्याबरोबर झालेल्या बंद खोलीतील चर्चेनंतर द्रविडने ही जबाबदारी नाकारली," असा गौप्यस्फोट गांगुलीने केला. 

वर्षभरापूर्वी शास्त्री यांची संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करताना खूप मोठा वाद झाला होता. माजी कसोटीपटू अनिल कुंबळे यांना त्या पदावरून हटवण्यासाठी राजकारण झाल्याच्या चर्चाही रंगल्या. त्याचवेळी सचिन तेंडुलकर, गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने फलंदाजांना सल्लागार म्हणून द्रविड, तर गोलंदाज सल्लागार म्हणून झहीर खानचे नाव सुचवले होते. मात्र, या पदांसाठी अनुक्रमे संजय बांगर आणि भरत अरुण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

द्रविडने ही जबाबदारी स्वीकारण्यास तयारी दर्शवली होती, परंतु शास्त्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्याने माघार घेतली. त्या बैठकीत असे काय झाले याची कल्पना नाही. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सल्लागार समितीत निवड प्रक्रियेवरून संभ्रमाचे वातावरण होते, असेही गांगुलीने नमूद केले. तो म्हणाला," राहुल द्रविड याला फलंदाज सल्लागार होण्यासाठी विचारणा केली होती आणि त्याने होकारही दिला होता. त्यानंतर त्याने शासस्त्रींशी चर्चा केला आणि काय झाले कोणास ठाऊक, द्रविडने माघार घेतली. त्यात न्यायालयाने नेमलेल्या समितीने निवड प्रक्रियेबाबत काहीतरी संभ्रम निर्माण केले. त्यामुळे द्रविडने माघार का घेतली, हे सांगणे अवघड आहे. पण शास्त्री यांना सर्व जबाबदारी दिली होती, तर त्यांनी संघाच्या कामगिरीत सुधारणा करून दाखवणे अपेक्षित होते." 

दरम्यान न्यायालयाने नेमलेल्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनी अशा निवडीबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले आणि मुख्य प्रशिक्षक निवडणे येवढेच क्रिकेट सल्लागार समितीचे काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवी शास्त्रीराहूल द्रविडसौरभ गांगुलीक्रिकेट