-सौरव गांगुली
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघासाठी द. आफिक्रतील मागी दहा दिवस अविस्मरणीय ठरले. विदेशी वातावरणाशी भारतीय खेळाडू जसजसे एकरूप होतात तसतशी त्यांची कामगिरी उंचावते, हे सत्य आहे. विराटच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करेल यात शंका नाही. कोहली व सहकाºयांना वाँडरर्सवरील विजय दीर्घकाळ स्मरणात राहील. या विजयाचा सकारात्मक परिणाम वन डे मालिकेतील पहिल्या विजयात दिसला.
वाँडरर्सवर चौथ्या दिवशी खेळपट्टीवरून जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर पाचव्या दिवशीचा खेळ सुरू करण्याचा निर्णय मॅच रेफ्रीवर विसंबून होता. रेफ्रीने पाचव्या दिवशी खेळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. अन्यथा पाहुण्या संघावर अन्याय झाला असता. योग्यता सिद्ध करण्याची संधी भारताला लाभली नसती. दुस-या डावातील डीन एल्गरची कामगिरीही लक्षवेधी ठरली. सलामीवीर एल्गरने दीर्घवेळ किल्ला लढविला. अजिंक्य रहाणे व भुवनेश्वरच्या कामगिरीवर मात्र मी आनंदी आहे. हे दोघे मौल्यवान खेळाडू आहेत. रहाणेच्या शानदार खेळीचे आश्चर्य वाटले नाही. मुळात तो प्रतिभवान फलंदाज आहे. पण कर्णधाराकडून शतक पूर्ण करण्याची कला मात्र त्याला शिकावी लागेल. रात्री जेवणानंतर ही माहिती त्याला मिळू शकते. वन डेत ८० धावांची त्याची खेळी अप्रतिम ठरली. दुसरीकडे विराट शतकासमीप पोहोचला तर तो शतक ठोकूनच परततो. मालिकेत अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक आहे. भारतीय संघाने गेल्या दोन विजयांसह द. आफ्रिकेला मानसिक धक्का दिलाच आहे. एबी डिव्हिलियर्स आणि डेल स्टेन यांच्या अनुपस्थितीत यजमान संघासाठी हे मोठे नुकसान ठरावे. अशावेळी एनगिडी आणि फेलुकवायो यांना बाहेर बसविणे परवडणारे नसावे. एकूणच सहा वन डे सामन्यांची मालिका द. आफ्रिका संघासाठी अवघड ठरेल,असे दिसते. (गेमप्लान)