Join us

मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरून राडा; ब्रिटिश मीडियात संमिश्र प्रतिक्रिया

काहींनी दिला संघाला दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 06:59 IST

Open in App

लंडन : ब्रिटिश मीडियाने गुलाबी चेंडूच्या कसाेटीत इंग्लंड संघाला भारताविरुद्ध दोन दिवसांत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे टीका केली आहे. त्यासाठी मीडियाने वादग्रस्त रोटेशन नीती व आपल्या फलंदाजाच्या तंत्रातील उणीव याला दोष दिला आहे, तर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीलाही दोष दिला आहे.इंग्लंडला गुरुवारी तिसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीपटूला अनुकूल खेळपट्टीवर भारताविरुद्ध १० गड्यांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे इंग्लंड संघ चार सामन्यांच्या मालिकेत १-२ ने पिछाडीवर पडला आहे.

सामना दोन दिवसांत संपल्यामुळे खेळपट्टीवर टीका होत आहे. त्यात  माजी खेळाडू मायकल वॉनने ही खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी आदर्श नसल्याचे म्हटले आहे. पण, ‘द गार्डियन’ वृत्तपत्राने इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीवर टीका केली आहे. त्यांच्या वृत्ताचा मथळा होता, ‘इंग्लंडच्या दोन दिवसांतील पराभवाच्या चौकशीमध्ये कुठले सोपे उत्तर मिळणार नाही.’ त्यात लिहिले आहे, ‘भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील निराशाजनक पराभवासाठी कुणाला दोषी ठरवायचे, हे कठीण आहे. कारण अनेक बाबी चुकीच्या झाल्या आहेत.’

वृत्तपत्राने पुन्हा रोटेशन नीतीला जबाबदार धरले आहे. त्यामुळे मालिकेत मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त परिस्थितीचे आकलन करण्यात संघ दोषी असल्याचे म्हटले आहे. ‘गेल्या आठवड्यात चेन्नईमध्ये झालेल्या पराभवाचा हँगओव्हर’ अशा शब्दात वृत्तपत्राने टीका केली आहे. या लेखात म्हटले आहे की, ‘पहिल्या डावात ज्यावेळी धावसंख्या दोन बाद ७४ होती त्याचा फलंदाजांना लाभ घेता आला नाही. हे इंग्लंड ॲॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डच्या चुकीच्या नीतीमुळे फिरकी गोलंदाजीविरुद्ध अनुभवाची उणीव, गुलाबी चेंडू, खेळपट्टीचे स्वरूप यामुळे घडले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळत होते.’

‘द सन’ने इंग्लंड संघ अयोग्य असल्याचे सांगत निवड प्रक्रियेवर टीका केली. डेव्ह किडने आपल्या स्तंभात म्हटले ,‘अयोग्य इंग्लंड संघाला अहमदाबादच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यात संघ एक फिरकीपटू व चार ‘११व्या क्रमांकाच्या’ फलंदाजांसह उतरला होता.’ ‘विजडन’ने या पराभवाबाबत लिहिले, ‘या देशात कसोटी सामन्यांच्या इतिहासात कधीच इंग्लिश क्रिकेट एवढे वाईट भासले नाही.’ पण, काही वृत्तपत्र व जाणकार असे होते की त्यांनी कसोटी सामना दोन दिवसांत संपण्यासाठी पूर्णपणे मोटेराची फिरकीला अनुकूल खेळपट्टी जबाबदार असल्याचे म्हटले आहे

. ‘द मिरर’मध्ये अँडी बन यांनी  लिहिले, ‘भारत या खेळपट्टीवर आपल्या खिलावृत्तीच्या मर्याद ओलांडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. हे कसोटी क्रिकेट नव्हते.’  मायदेशातील परिस्थितीचा लाभ घेणे चांगले आहे, ही पाच दिवसांच्या लढतीसाठी चांगली खेळपट्टी नव्हती. त्यामुळे इंग्लंडने जवळ जवळ ९० वर्षांत भारतात एवढ्या कमी कालावधीत कसोटी सामना गमावला.’

...त्यामुळे स्टेडियमच्या निलंबनाची कारवाई होणार नाही

 ’द टेलिग्राफ’चे प्रसिद्ध लेखक सिल्ड बॅरी यांच्या मते, ‘ही अनफिट खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी नव्हती. भारताच्या विश्व चॅम्पियनशिपमधील गुणांमध्ये कपात करायला हवी. 

बॅरी यांनी आयसीसीकडे नवनिर्मित नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमला अशी सुमार खेळपट्टी तयार करण्यासाठी बॅन करायला हवे, अशी मागणी केली. पण, आयसीसी असा धाडसी निर्णय घेईल, असे त्यांना वाटत नाही. कारण या मैदानाचे नाव भारताच्या पंतप्रधानांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. बॅरी यांनी लिहिले, ‘आयसीसी नियमांनुसार नरेंद्र मोदी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून १२ ते १४ महिन्यांसाठी निलंबित करायला हवे.’

‘फलंदाजांनी बचावात्मक पद्धतीने फलंदाजी केली आणि बळी दिला. अनेक फलंदाज सरळ चेंडूवर बाद झाले. कसोटी सामन्यात हे आदर्श उदाहरण नव्हते. येथे भारतीय फलंदाजदेखील चालले नाहीत. इंग्लंडने पहिल्या डावात २०० धावा केल्या असत्या तर भारतीय संघ अडचणीत आला असता. पण दोन्ही संघांसाठी खेळपट्टी समान होती.’     -सुनील गावसकर

‘जर तुम्ही अशा पद्धतीचे खेळपट्टी तयार करणार असाल तर एक काम करा संघांना तीन डाव खेळण्याची परवानगी द्या.’     - मायकेल वॉन, माजी कर्णधार, इंग्लंड 

‘कसोटी क्रिकेटसाठी ही खेळपट्टी चांगली नव्हती. तरीदेखील अक्षरने शानदार गोलंदाजी केली. अश्विन आणि ईशांत यांचे अभिनंदन’.     - व्हीव्हीएस लक्ष्मण

 एका सामन्यासाठी अशी खेळपट्टी ठिक आहे. जेथे फलंदाजाचे कौशल्य आणि तंत्र याची परीक्षा होते. पण अशा प्रकारची खेळपट्टी पुन्हा पाहण्याची इच्छा नाही. कोणत्याच खेळाडूची अशी इच्छा नसेल. भारताची खूप चांगली कामगिरी झाली.’     - केविन पिटरसन,  माजी  क्रिकेटपटू

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडनरेंद्र मोदी स्टेडियमबीसीसीआय