Join us

'सहा चेंडू टाकले तरी असह्य वेदना व्हायच्या. असं वाटायचं की…'; अश्विनचा अंगावर काटा आणणारा अनुभव

"भारताला मी इतके सामने जिंकवून दिले. पण माझ्या वाईट काळात मला पाठिंबा द्यायला कोणीच का नाही, असा विचार माझ्या मनात सारखा यायचा."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 19:04 IST

Open in App

मुंबई : अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन हा भारतीय क्रिकेट संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहेच, पण त्यासोबतच नुकत्याच झालेल्या वन डे आणि टी २० सामन्यांमध्येही त्याने आपल्या गोलंदाजीचा प्रभाव दाखवून दिला. त्यामुळे सध्या अश्विनला संघात समाविष्ट करण्यास कोणत्याही कर्णधाराची पहिली पसंती असते. पण अश्विनच्या कारकिर्दीतही एक विचित्र असा काळ आला होता. खूप प्रयत्न करूनही कामगिरी सुधारणा होत नसल्याने मधल्या काळात अश्विनवर संघाबाहेर दीर्घकाळ बसण्याची वेळ ओढवली होती. त्यावेळी अश्विनच्या मनात नको नको त्या विचारांनी काहून माजवलं असल्याचं खुद्द त्यानेच एका मुलाखतीत सांगितलं.

"२०१८ ते २०२० या कालावधीत मी खूपच खचून गेलो होतो. त्यावेळी माझ्या मनात निवृत्ती स्वीकारण्याचे विचार अनेकदा डोकावून गेले. त्या वेळी मी कामगिरीत सुधारणा करण्याचा जितका जास्त प्रयत्न करायचो तितकं माझ्यासाठी सारं अवघड होऊन बसायचं. दुखापतींनी ग्रस्त असल्यामुळे माझा स्वत:वरचा विश्वास कमी होत होता. फक्त सहा चेंडू टाकले तरीही मला धाप लागायची. अख्खं शरीर खूप दुखायचं. प्रचंड वेदना व्हायच्या. त्यानंतर मला समजलं की आपल्या दुखापतीच्या अनुषंगाने आपल्याला थोडे बदल करणं गरजेचं आहे", असं अश्विन म्हणाला.

"गोलंदाजी करताना माझा गुडघा दुखायचा. गुडघ्याच्या वेदनेची जाणीव झाली की मी पुढचा चेंडू टाकताना उडी मारणं टाळायचो. त्यामुळे प्रभावी गोलंदाजी करणं कठीण होऊन बसलं होतं. तिसऱ्या चेंडूनंतर तर मी वेगवेगळे प्रयोग करायचो आणि त्यामुळे खूप थकून जायचो. सहावा चेंडू टाकल्यानंतर माझ्या अंगात ताकदच शिल्लक राहायची नाही. त्यावेळी असं वाटायचं की आता बास झालं. आता मी पुढे गोलंदाजी करू शकत नाही", असा अनुभव त्याने सांगितला.

"मी त्या वेळी खूपच वाईट मानसिक स्थितीत होतो. त्यामुळे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारावी असा विचार मला अनेक गोष्टींमुळे येत होता. चाहते किंवा इतर क्रिकेट जाणकार माझ्या दुखापतीबाबत फारसे संवेदशनशील नसल्याचं त्या काळात मला जाणवलं. इतर खेळाडूंना त्यांच्या पडत्या काळात अनेकांनी पाठिंबा दिला मग मला तो पाठिंबा का मिळत नाही, असा विचार माझ्या मनात सारखा येत राहायचा. मी भारताला अनेक सामने जिंकवून दिलेत, तरीही माझ्या वाईट काळात माझ्या पाठिशी कोणीच का उभं राहत नाही, असा विचार मी करत असायचो. मला सहसा कोणाच्याही आधाराची गरज भासत नाही. पण त्या वेळी मला एका खांद्याची गरज वाटत होती. पण त्यावेळी मला तसा आधार मिळाला नाही. त्यामुळे मी स्वत:च कंबर कसली आणि पुन्हा नव्या जोमाने उभा राहिलो", असा भावनिक अनुभव अश्विनने शेअर केला.

टॅग्स :आर अश्विनभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App