Join us

आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नंतर आयपीएलमधून निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:53 IST

Open in App

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नंतर आयपीएलमधून निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळल्यानंतर, त्याने आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली. आता तो परदेशी टी-२० लीगमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे.

अश्विनला सध्या यूएईतील आंतरराष्ट्रीय लीग टी-२० आणि ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग  या दोन प्रमुख लीगमध्ये खेळण्यासाठी ऑफर्स मिळाल्या आहेत. क्रिकबझच्या अहवालानुसार, अश्विनने आयएलटी- २० च्या लिलावासाठी नोंदणी केली असून, त्याला बीबीएलमधील चार मोठ्या फ्रँचायझींकडून ऑफर मिळाल्या आहेत. त्यामध्ये सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर, होबार्ट हरिकेन्स आणि अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स यांचा समावेश आहे. मात्र, त्याला यापैकी केवळ एक संघ निवडावा लागणार आहे.

बीबीएल २०२५-२६ हंगाम १४ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान खेळवला जाईल. तर, आएलटी-२० स्पर्धा १० जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यामुळे अश्विन सुरुवात आयएलटी- २० मधून करेल आणि नंतर बीबीएलमध्ये मर्यादित सामन्यांसाठी सहभागी होऊ शकतो.

लिलावासाठी अधिकृत नोंदणी

यूएई लीगच्या आगामी लिलावासाठी अश्विनने स्वतः नोंदणी केली. त्याने आशा व्यक्त केली आहे की, सहा पैकी कोणती तरी फ्रँचायझी त्याच्यावर बोली लावेल. सध्या आयएलटी-२० मधील सर्व संघांनी थेट करार केले आहेत, त्यामुळे अश्विनसाठी लिलाव हा एकमेव मार्ग आहे.

बीबीएलबाबत लवकरच निर्णय

अश्विनने बीबीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, निर्णय काही दिवसांत घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत. शिवाय, अश्विन भविष्यात अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट आणि इंग्लंडमधील द हंड्रेड लीगमध्येही सहभागी होऊ शकतो.

३३३ टी-२० सामन्यांचा अनुभव

अश्विनचा टी-२० क्रिकेटमधील मोठा अनुभव परदेशी लीगसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्याने आतापर्यंत ३३३ टी-२० सामन्यांमध्ये ३१७ विकेट्स घेतल्या आहेत आणि १ हजार २३३ धावा काढल्या आहेत. दरम्यान, अश्विन बीबीएलमध्ये कोणत्या संघात सहभागी होतो आणि आयएलटी-२० च्या लिलावात त्याच्यावर कोण बोली लावते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

टॅग्स :आर अश्विनटी-20 क्रिकेटऑफ द फिल्ड