भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन गेल्या वर्षीच्या अखेरीस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान निवृत्त झाला. नुकतेच त्याने भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडची मुलाखत घेतली आहे. दोघांमधील संभाषणादरम्यान अश्विनने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती का घ्यावी लागली? त्यामागचे खरे कारण सांगितले आहे.
अनिल कुंबळेनंतर ५०० पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज आर. अश्विनने गेल्या डिसेंबरमध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीनंतर अचानक निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यासंदर्भात राहुल द्रविडशी बोलताना त्याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. "संघात निवड होऊनही मला प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आले, असे विदेशी दौऱ्यात बऱ्याच वेळा झाले. शेवटी, मी कंटाळून निवृत्तीचा निर्णय घेतला. निवृत्तीमागचे दुसरे कारण माझे कुटुंब आहे. माझे मुलंही मोठे होत आहेत, इथे बसण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवणे योग्य आहे का? असाही प्रश्न त्यावेळी मला पडला. माझ्या मनात नेहमीच असे होते की मी ३४-३५ व्या वर्षी निवृत्त होईन. परंतु, मला सतत संघाच्या प्लेईंग इलेव्हनमधून वगळले जात असल्याने मी निवृत्तीचा निर्णय घेतला", असे अश्विन म्हणाला.
अश्विनने परदेशात किती विकेट्स घेतल्या?अश्विनने नोव्हेंबर २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याने भारतात खेळलेल्या ६५ कसोटी सामन्यांमध्ये ३८३ विकेट्स आणि ४० परदेशी कसोटी सामन्यांमध्ये १५० विकेट्स घेतल्या. २०१९-२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (न्यूझीलंड, इंग्लंड विरुद्ध) ४ विकेट्स घेतल्या.