Join us  

R Ashwin : दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी आर अश्विनला मिळाली आनंदाची बातमी

भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड जवळपास पक्की झाली आहे. त्यात त्याला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 2:03 PM

Open in App

भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड जवळपास पक्की झाली आहे. रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांना दुखापतीमुळे या दौऱ्यावरून माघार घ्यावी लागणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. अशात  आर अश्विन हा प्रमुख फिरकीपटू म्हणून संघासोबत जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं अद्याप संघ जाहीर केलेला नाही, परंतु अश्विनचा समावेश पक्का मानला जात आहे. त्यात आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी अश्विनला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आर अश्विनला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. १४ विकेट्स घेतल्या. शिवाय फलंदाजीतही योगदान दिले. 

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील अष्टपैलू कामगिरीमुळे आर अश्विनची आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या मालिकेत अश्विननं भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत तिसरे स्थान पटकावताना हरभजन सिंग याचा ४१७ विकेट्सचा विक्रम मोडला . आर अश्विननं एका स्थानाच्या सुधारणेसह दुसरा क्रमांक पटकावला.  रवींद्र जडेजा मात्र दोन स्थान खाली सरकला आहे. बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर आला. गोलंदाजांमध्येही आर अश्विन ८८३ रेटींग पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर अश्विननं ८१ कसोटी सामन्यांत ४२७ विकेट्स घेतल्या आहेत. ७ बाद ५९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. त्याच्या नावावर कसोटीत ५ शतकं व ११ अर्धशतकंही आहेत आणि त्यानं एकूण २७५५ धावा केल्या आहेत. 

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या मयांक अग्रवाल व एका डावात दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेल यांनीही कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली. मयांकनं दुसऱ्या कसोटीत १५० व ६२ धावींची खेळी केली आणि त्यामुळे तो ३० स्थानांच्या सुधारणेसह ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. एजाझ पटेल  २३ स्थानावर पोहोचला आहे.    

टॅग्स :आर अश्विनआयसीसीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामयांक अग्रवाल
Open in App