मोहाली : किंग्स इलेव्हन पंजाब संघ मंगळवारी आपल्या गोलंदाजी विभागातील अडचण दूर करीत विजयी लय पकडलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुन्हा एकदा विजयी लय प्राप्त करण्यास उत्सुक आहे. रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली किंग्स इलेव्हन पंजाब संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे पाचव्या स्थानी घसरला आहे. यजमान संघाने आतापर्यंत आठपैकी चार सामन्यांत विजय मिळवला आहे.
पंजाबच्या गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. संघाला मुंबई इंडियन्सविरुद्ध १९७ धावांचा बचाव करता आला नव्हता. त्यात किरोन पोलार्डने ३१ चेंडूंना सामोरे जाताना ८३ धावांची खेळी केली होती. बेंगळुरूविरुद्ध गेल्या लढतीत पंजाब संघाची गोलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरली. प्रतिस्पर्धी संघाने ४ चेंडू राखून १७३ धावांचे लक्ष्य गाठले होते.
मोहम्मद शमी, अँड्य्रू टाय व अष्टपैलू सॅम कुरेन महागडे ठरले होते. त्यामुळे यजमान संघाला मोठा फटका बसला होता. आता त्यांना कर्णधार अश्विनला सहकार्य करण्यासाठी अचूक मारा करावा लागेल. अश्विन विविधतेच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यात सक्षम आहे.
राजस्थान रॉयल्स गेल्या लढतीत विजय मिळवत येथे दाखल झाला आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सला त्यांच्याच मैदानावर ४ गडी राखून पराभूत केले. राजस्थानने सात सामन्यांत २ विजय मिळवले असून ते गुणतालिकेत सातव्या स्थानी आहेत. सलामीवीर जोस बटलरने ४३ चेंडूंत ८९ धावांची खेळी करीत राजस्थानला १८८ धावांचे लक्ष्य गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.