महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर पुणेकरांचे वर्चस्व

पदाधिकाऱ्यांनी निवड बिनविरोध : अध्यक्षपदी विकास काकतकर, सचिवपदी रियाझ बागवान यांची फेरनिवड, अजय गुप्ते उपाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 10:45 PM2019-10-02T22:45:31+5:302019-10-02T22:46:38+5:30

whatsapp join usJoin us
Pune is dominated by Maharashtra Cricket Association | महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर पुणेकरांचे वर्चस्व

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर पुणेकरांचे वर्चस्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे : घटनेची मान्यता आणि त्यासंदर्भात उपस्थित झालेले वाद यामुळे चर्चेत आलेली महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची (एमसीए) निवडणूक बुधवारी पार पडली. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांची निवडणूक बिनविेरोध झाली. विशेष म्हणजे, या सर्व पदांवर विविध गटांमधून पुणेकर निवडून आले.
गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये ही एमसीएची विशेष सर्वसाधारण सभा झाली. यात झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी विकास काकतकर तर, उपाध्यक्षपदी अजय गुप्ते यांची निवड झाली. रियाझ बागवान यांची सचिवपदी फेरनिवड झाली. संयुक्त सचिवपदी राहुल ढोले पाटील आणि कोषाध्यक्षपदी शुभेंद्र भांडारकर बिनविरोध निवडून आले. राज्याचे माजी निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. बीसीसीआयमध्ये एमसीएचे प्रतिनिधी म्हणून रियाझ बागवान यांची एकमताने निवड करण्यात आली.
बेनिफेक्टर, लाईफ मेंबर्स आणि पॅट्रन्स हा गट तसेच फाऊंडर जिमखाना, विभाग गटांपैकी पश्चिम विभाग आणि आंतररराष्ट्रीय खेळाडूंचा गट (प्रत्येकी एक पुरुष आणि महिला) यांचा अपवाद वगळता अ‍ॅपेक्स कौन्सिलची निवडही बिनविरोध झाली. बेनिफेक्टर, लाईफ मेंबर्स आणि पॅट्रन्स गटातून २ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अजय गुप्ते (४६ पैकी ४४ मते) आणि विकास काकतकर (४६ पैकी ४२) हे निवडून आले. तिसरे उमेदवार सुनील मुथा यांना २ मते मिळाली.
फाऊंडर जिमखाना गटातून एका जागेसाठी तिघे रिंगणात होते. यात पूना क्लबचे राहुल ढोले पाटील ५ पैकी ३ मते घेत निवडून आले. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे विनायक द्रविड यांना २ मते पडली. डेक्कन जिमखान्याचे मंगेश भुस्कुटे (०) यांनी निवडणूक लढवूनही आपले मत प्रतिस्पर्धी उमेदवाराला दिले. पश्चिम विभाग गटासाठी झालेल्या निवडणुकीत कोल्हापूर आणि रायगड जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी म्हणून अनुक्रमे छत्रपती संभाजी (४ पैकी ४ मते) आणि चंद्रकांत मते (४ पैकी ४ मते) निवडून आले. रत्नागिरी जिल्हा संघटनेचे उमेदवार किरण सामंत (०) हेही रिंगणात होते. मात्र त्यांनी आपले मत प्रतिस्पर्धी उमेदवाराला दिले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या गटाचा निकाल राखून ठेवला
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या निर्देशानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या गटामधून एक पुरुष आणि एक महिला अशा दोघांना प्रतिनिधीत्व देणे आवश्यक होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी ‘बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या २ जागांसाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे,’ असे निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांनी कळविले होते. आज सकाळी ‘तुम्ही निवडणूक लढवू शकता,’ असे माजी खेळाडूंना कळविण्यात आले. तांत्रिक बाबीमुळे असे घडल्याचे स्पष्टीकरण सहारिया यांनी दिले. या गटाची निवडणूक झाली. मात्र, प्रशासकीय समितीचे पुढील निर्देश येईपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला. यावर माजी खेळाडू असलेल्या यजुवेंद्र सिंग आणि शुभांगी कुलकर्णी यांनी आक्षेप नोंदविला.

उमेदवार आणि पत्रकारांच्या प्रश्नाला सहारिया यांचे उत्तर... कोर्टात जा
अ‍ॅपेक्स कौन्सिलमधील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या २ जागांसाठीच्या निवडणुकीवरून उद्भवलेल्या गोंधळाबाबत निवडणूक अधिकारी असलेल्या जे. एस. सहारिया यांना प्रश्न विचारण्यात आले. ही निवडणूक लढविलेल्या यजुवेंद्र सिंग आणि शुभांगी कुलकर्णी हे उमेदवार तसेच पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारले असता सहारिया यांनी अनेकदा ‘कोर्टात जा’ असे उत्तर दिले. नंतर त्यांनी याचे साविस्तर उत्तर दिले. मात्र त्यामुळे उमेदवारांचे समाधान झाले नाही.


नवी कार्यकारिणी अशी :
अध्यक्ष : विकास काकतकर (बेनिफेक्टर्स, लाईफ मेंबर्स, पॅट्रॉन्स गट, पुणे), उपाध्यक्ष : अजय गुप्ते (बेनिफेक्टर्स, लाईफ मेंबर्स, पॅट्रॉन्स गट, पुणे), सचिव : रियाझ बागवान (संलग्न क्लब गट : स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब, पुणे), संयुक्त सचिव : राहुल ढोले पाटील (फाऊंडर आणि स्पेशल जिमखाना गट : पूना क्लब, पुणे), कोषाध्यक्ष : शुभेंद्र भांडारकर (संलग्न क्लब गट : जे. एन. मार्शल स्पोर्ट्स क्लब, पुणे).
अ‍ॅपेक्स कौन्सिल सदस्य : रियाझ बागवान, शुभेंद्र भांडारकर, अजय गुप्ते, विकास काकतकर, गौतम सोनावणे (महाविद्यालय विभाग : फर्ग्युसन महाविद्यालय), आमीर सलीम (मध्य विभाग : बीड जिल्हा क्रिकेट संघटना), अरुण जगताप (मध्य विभाग : अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटना), बलजितसिंग लांगरी (पूर्व विभाग : नांदेड जिल्हा क्रिकेट संघटना), संतोष बोबडे (पूर्व विभाग : परभणी जिल्हा क्रिकेट संघटना), राजवर्धन कदमबांडे (उत्तर विभाग : धुळे जिल्हा क्रिकेट संघटना), युवराज पाटील (उत्तर विभाग : नंदूरबार जिल्हा क्रिकेट संघटना), कमलेश पिसाळ (दक्षिण विभाग : सातारा जिल्हा क्रिकेट संघटना), संजय बजाज (दक्षिण विभाग : सांगली जिल्हा क्रिकेट संघटना), चंद्रकांत मते (पश्चिम विभाग : रायगड जिल्हा क्रिकेट संघटना), छत्रपती संभाजी (पश्चिम विभाग : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटना), राहुल ढोले पाटील.

Web Title: Pune is dominated by Maharashtra Cricket Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.