नागपूर : शेष भारत व विदर्भ क्रिकेट संघाने इराणी चषक सामन्याच्या चौथ्या दिवशी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) निषेध नोंदवला. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मनगटावर काळ्या फिती बांधून आपला निषेध व्यक्त केला. इतकेच नाही तर मैदानावरील पंच नंदन व नितीन मेमन यांनीही मनगटाला काळ्या फिती बांधल्या होत्या. शेष भारताच्या पहिल्या डावातील 330 धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भने 425 धावा चोपल्या. दुसऱ्या डावात शेष भारताने संयमी खेळ करताना उपहारापर्यंत 2 बाद 221 धावा करताना 122 धावांची आघाडी घेतली. बीसीसीआयनेही खेळाडूंच्या या निषेधाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत खेळाडूंनी 'पाकिस्तानशी आता चर्चा करण्यात वेळ दवडू नका, आता चर्चा नको, तर युद्धच पुकारा!', अशी संपत्प प्रतिक्रीया दिली आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे जवानांप्रती असलेले प्रेम सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्याने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवताना पाकिस्तानला धारेवर धरले. गौतम गंभीरसह अनेक भारतीय खेळाडूंनी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.