Join us

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत पुजाराला मिळणार डच्चू ?

संघ व्यवस्थापन :

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 05:21 IST

Open in App

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून आठ गड्यांनी पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनला घाम फुटला. संघाच्या पराभवाचे विश्लेषण सुरू झाले आहे. समीक्षेनंतर कठोर संदेश देण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार दिसतो. जाणकारांच्या मते भारताची कमकुवत फलंदाजी चर्चेचा विषय बनली. कसोटी क्रिकेटचा आधारस्तंभ असलेला चेतेश्वर पुजारा दोन्ही डावात फ्लॉप ठरला.

भारताला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी पुजाराला अंतिम अकरा खेळाडूंमधून डच्चू देण्याचा विचार सुरू आहे. इन्साईड स्पोर्ट्‌सच्या वृत्तानुसार भारतीय संघ व्यवस्थापन पुजाराऐवजी लोकेश राहुल किंवा अनुमा विहारी यांचा समावेश करण्याच्या विचारात आहे. पुजारामुळे विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावरदेखील दडपण येत आहे. त्यामुळे कोहली आता तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आलेला दिसेल. सध्या तो कसोटीत चौथ्या स्थानावर फलंदाजीला येतो.

अपयशी कामगिरी सुरूच

कसोटी संघाच्या यशात पुजाराची कामगिरी नेहमी अधोरेखित झालेली आहे. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात मात्र त्याने घोर निराशा केली. जानेवारी २०२० नंतर पुजाराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास त्याचा स्ट्राईक रेट घसरलेला दिसेल. यादरम्यान त्याची सर्वोच्च खेळी ७७ इतकी आहे. सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने या धावा केल्या होत्या. मागच्या ३० डावांमध्ये त्याने एकही शतक ठोकलेले नाही. जानेवारी २०२० पासून पुजाराची धावसरासरी २६.३५ इतकी राहीली.

सिराज, शार्दुल यांना संधी

भारतीय गोलंदाजीची स्थिती वेगळी नाही. जसप्रीत बुमराह फॉर्मशी झुंजत आहे. ईशांत शर्मा जखमी झाला. मोहम्मद शमीने प्रभावित केले मात्र त्याला दुसऱ्या टोकाहून यशस्वी साथ लाभत नाही. यामुळे आता नवा गेमप्लान तयार करण्याचा विचार सुरू आहे. सिराज, शार्दुल आणि ओवेस खान यांच्यासारख्या गोलंदाजांना कसोटीत स्थान मिळू शकेल. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघचेतेश्वर पुजारा