Join us  

प्रिया पुनियाची शतकी खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

प्रिया पुनिया मैदानावर असेपर्यंत सामना भारताचा बाजूने होता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 1:33 PM

Open in App

ऑस्ट्रेलिया अ संघानं पहिल्या वन डे सामन्यातील पराभव विसरून दुसऱ्या सामन्यात दमदार कमबॅक केले. ऑस्ट्रेलिया अ संघानं शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारत अ संघावर 81 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या 315 धावांच्या प्रत्युत्तरात भारताच्या प्रिया पुनियानं खणखणीत शतक झळकावलं, परंतु तिला अन्य फलंदाजांकडून साजेशी साथ न मिळाल्यानं भारताला हा सामना गमवावा लागला.प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया अ संघानं 5 बाद 315 धावा केल्या. जॉर्जिया रेडमायने आणि एरीन बर्न्स यांनी शतकी खेळी केली. जॉर्जियानं 128 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 113 धावा चोपल्या. बर्न्सनं 59 चेंडूंत 13 चौकार व 5 षटकार खेचून 107 धावांची वादळी खेळी केली. त्यांना ब्रिजेट पॅटरसन ( 47) आणि हिदर ग्रॅहम ( 34) यांनी छोटेखानी खेळी करून उत्तम साथ दिली. भारताच्या देविका वैद्यनं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, परंतु त्यासाठी तिनं 72 धावा मोजल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना प्रिया पुनिया आणि शेफाली वर्मा यांनी दमदार सुरुवात केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 98 धावा जोडल्या. शेफालीनं पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली होती, परंतु या लढतीत तिला 46 धावा करता आल्या. 36 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून तिनं 46 धावा केल्या. मागील सामन्यातील दुसरी शतकवीर वेदा कृष्णमुर्तीनंही 58 चेंडूंत 2 चौकार लगावत 40 धावा केल्या. पण, भारताच्या चार फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. प्रियाकडून अपेक्षा होत्या, परंतु तिला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. प्रियानं 127 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकार खेचून 112 धावा केल्या. भारताचा संपूर्ण संघ 44.1 षटकांत 234 धावांत तंबूत परतला. अॅनाबेल सदरलँडनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मोली स्ट्रानोनं तिन विसेट्स घेत तिला चांगली साथ दिली.   

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारतआॅस्ट्रेलिया