भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ याची क्रिकेट कारकीर्द सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे भारतीय संघातील पुनरागमानासाठीचे दरवाजे त्याच्यासाठी सध्यातरी बंद दिसत आहेत. एवढंच नाही तर मुंबईच्या क्रिकेट संघातील पृथ्वी शॉचं स्थान धोक्यात आलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता पृथ्वी शॉ याने एक मोठा निर्णय घेत मुंबईच्या क्रिकेट संघाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो महाराष्ट्रच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आज एक पत्रक प्रसिद्ध करत या संदर्भातील माहिती दिली आहे. आता ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी यांच्यासारख्या स्टार खेळांडूंबरोबरच पृथ्वी शॉ हासुद्धा महाराष्ट्राच्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. पृथ्वी शॉ याने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी झगडत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रच्या संघाकडून खेळण्याच्या निर्णयाबाबत पृथ्वी शॉ याने सांगितले की, महाराष्ट्रच्या संघाकडून खेळण्याच्या निर्णयाकडे मी माझ्या कारकीर्दीचा विचार करता एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहतो. तसेच मी मुंबई क्रिकेट संघटनेचा कायम ऋणी राहीन. तसेच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने हल्लीच्या काळामध्ये या खेळाच्या विकासात खूप चांगलं काम केलं आहे. ऋतुराज गायकवाड, अंकित बावने, राहुल त्रिपाठी यांसारख्या प्रतिभावंत खेळाडूंसोबत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे, असे त्याने सांगितले.
तर पृथ्वी शॉ याच्या महाराष्ट्राच्या संघात केलेल्या समावेशााबाबत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, पृथ्वी शॉसारखा गुणी खेळाडू आमच्या संघात येणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्याचा अनुभव युवा खेळाडूंसाठी उपयुक्त ठरेल. आम्ही या नव्या डावासाठी पृथ्वी शॉ याला शुभेच्छा देतो.