Prithvi Shaw Angry, Instagram Story Viral : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली स्पर्धा नुकतीच संपली. त्यात मुंबईच्या संघाने विजेतेपद पटकावले. आता २१ डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) सुरू होत आहे, जी १८ जानेवारीपर्यंत खेळवली जाईल. या लिस्ट-ए स्वरूपाच्या स्पर्धेत एकूण ३८ संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघ व्यवस्थापनांनी आपापल्या चमूची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईनेही (Mumbai) आपला १७ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. मात्र या संघातून पृथ्वी शॉ याला वगळण्यात आले आहे. SMAT मधील त्याची कामगिरी पाहून निवडकर्त्यांनी त्याला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला असावा. पण निवडकर्त्यांच्या या निर्णयावर शॉ मात्र नाराज दिसला.
पृथ्वी शॉ ने निवडीविरोधात पोस्ट केली इन्स्टा स्टोरी
पृथ्वी शॉ ची अलीकडची कामगिरी अत्यंत खराब आहे. याशिवाय त्याच्या फिटनेसवरही सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तंदुरुस्तीमुळे त्याला रणजी ट्रॉफीच्या संघातूनही वगळण्यात आले होते. यानंतर त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले, परंतु या स्पर्धेतही तो फ्लॉप ठरला. अशा परिस्थितीत आता मुंबईच्या निवड समितीने शॉ ला पुन्हा एकदा संघातून वगळले आहे. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉने सोशल मीडियावर लिस्ट-ए मधील आकडेवारी शेअर करून या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. "देवा, मला आणखी काय-काय बघावं लागणार आहे ... ६५ सामने, ३३९९ धावा, ५५.७०ची सरासरी, १२६ चा स्ट्राइक रेट ... माझे हे आकडे खेळासाठी पुरेसे नाहीत. पण मी खचणार नाही, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि कदाचित चाहते माझ्यावर विश्वास ठेवतील. कारण मी नक्कीच पुनरागमन करेन.. ओम साई राम.." असे त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये फ्लॉप
पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एकूण ९ सामने खेळले. त्यात त्याने २१.८८ च्या सरासरीने केवळ १९७ धावा केल्या. त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या ४९ धावा होती. तसेच त्याचे वाढते वजन आणि फिटनेसबाबत फारसे गांभीर्य नसणे यामुळेही त्याच्याबद्दल सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात. त्याचाच फटका त्याला बसल्याची चर्चा आहे.