Preity Zinta Court Matter, Punjab Kings Team IPL 2025: पंजाब किंग्ज संघ यंदा दमदार कामगिरी करत आहे. गुणलातिकेत टॉप ४ मध्ये स्थान मिळवून, प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. पण तसे असूनही संघाची मालकीण प्रीती झिंटा कोर्टात पोहोचली आहे. प्रश्न असा आहे की याचे कारण काय? काही दिवसांपूर्वी वैभव सूर्यवंशीचा प्रिती झिंटासोबत एक खोटा फोटो व्हायरल झाला होता. याच कारणामुळे तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे का? १८ मे रोजी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यानंतर, प्रीती झिंटाचा वैभव सूर्यवंशीला मिठी मारतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. जेव्हा लोकांना तो फोटो खरा वाटू लागला, तेव्हा प्रीती झिंटाने स्वतः येऊन स्पष्टीकरण दिले की, तो फोटो खोटा आहे. आता त्या घटनेनंतर दोन दिवसांतच प्रीती झिंटाने न्यायालयात धाव घेतल्याची बातमी आली आहे.
प्रीती झिंटा पोहोचली कोर्टात, काय आहे प्रकरण?
प्रीती झिंटाने न्यायालयात जाण्यामागील कारण वैभव सूर्यवंशीसोबतचा तिचा बनावट फोटो अजिबात नाही. यामागील कारण म्हणजे तिचा आयपीएल संघ पंजाब किंग्जच्या इतर सह-मालकांसोबत सुरू असलेला वाद. KPH ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडची मालकीण आणि संचालक प्रीती झिंटा हिने पुन्हा एकदा सह-संचालक मोहित बर्मन आणि नेस वाडिया यांच्याविरुद्ध चंदीगड न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत प्रीती झिंटाने २१ एप्रिल रोजी झालेल्या कंपनीच्या AGM ला बेकायदेशीर आणि अवैध घोषित करण्याची मागणी केली आहे. मोहित बर्मनच्या वतीने नेस वाडिया यांच्या सक्रिय पाठिंब्याने कंपनी कायदा, २०१३ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिवालय मानकांचे उघड उल्लंघन करून ही बैठक आयोजित करण्यात आली होती, असा दावा प्रितीने केला आहे.
AGM मध्ये मंजूर झालेले ठराव थांबवण्याची मागणी
त्या बैठकीत पारित झालेल्या कोणत्याही ठरावाची अंमलबजावणी करण्यापासून मोहित बर्मन आणि नेस वाडिया यांना रोखण्यात यावे आणि मुनीश खन्ना यांना कंपनीचे संचालक म्हणून काम करण्यापासून किंवा स्वतःला संचालक म्हणून घोषित करण्यापासून रोखण्यात यावे अशी मागणी प्रीती झिंटाने याचिकेत केली आहे. शिवाय, त्यांनी कंपनी आणि इतर संचालकांना त्यांच्या आणि करण पॉल यांच्या उपस्थितीशिवाय आणि मुनीश खन्ना यांच्या उपस्थितीत, खटल्याच्या प्रलंबित कालावधीत कोणतीही बोर्ड बैठक किंवा सर्वसाधारण सभा घेण्यापासून किंवा कंपनीच्या कारभाराशी संबंधित कोणतेही काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रीती झिंटाकडे कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत खाजगी कंपनी केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये २३% हिस्सा आहे. पंजाब किंग्ज क्रिकेट संघाची मालकी असलेली ही कंपनी IPL ची अधिकृत फ्रँचायझी मालक आहे.