Join us
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांवरील व्यक्तींना ‘सरावबंदी’, खेळाडूंकडून भरून घेणार सहमती पत्र

बीसीसीआय : खेळाडूंकडून भरून घेणार सहमती पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 03:17 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोरोनानंतर सराव सुरू करण्यासाठी संलग्न राज्य संघटनांसाठी शंभर पानांची नियमावली (मानक संचालन प्रक्रिया) तयार केली आहे. यानुसार ६० वर्षांवरील व्यक्तींना सरावात सहभागी होता येणार नाही. याशिवाय कोरोनाच्या प्रकोपात जोखीम पत्करून सराव करण्याची तयारी आहे, या आशयाचे सहमती पत्र प्रत्येक खेळाडूकडून घेतले जाईल. क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी बीसीसीआयच्या नियमावलीनुसार प्रत्येक खेळाडू, स्टाफ आणि हितधारकांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी पूर्णपणे संबंधित राज्य संघटनांची असेल.

६० वर्षांवरील सहयोगी स्टाफ, अधिकारी, मैदान कर्मचारी आणि उपचार घेत असलेल्यांना सराव शिबिरात सहभागी होण्यास बंदी असेल. सरावाला पोहोचण्यासाठी आणि सरावादरम्यान खेळाडूृंना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. सराव सुरू होण्याआधी वैद्यकीय पथक आॅनलाईन पद्धतीने खेळाडू आणि स्टाफचा प्रवास आणि वैद्यकीय ईतिहास जाणून घेणार आहे. कुणाला कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याची पीसीआर चाचणी होईल.नियमावलीनुसार प्रत्येक दिवसाआड दोन चाचण्या होतील. दोन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास शिबिरात स्थान दिले जाईल. खेळाडूंना स्टेडियमपर्यंत येतेवेळी एन ९५ मास्क(विना व्हॉल्व)आणि चष्मा घालावा लागेल. सरावासाठी आरोग्य अधिकारी वेबिनारचे आणि पहिल्या दिवशी शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करतील. खेळाडूंनी स्टेडियमपर्यंत स्वत:च्या वाहनातून येण्यास प्राधान्य द्यावे. आयसीसीच्या निर्देशानुसार खेळाडूंना चेंडूवर लाळेचा वापर करण्यास बंदीअसेल.

अरुणलाल, वॉटमोर अडचणीत६० वर्षांवरील व्यक्तींना सरावात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे बंगालचे कोच अरुणलाल आणि बडोदा संघाचे आॅस्ट्रेलियन कोच डेव्ह वॉटमोर अडचणीत आले आहेत. ६६ वर्षांचे वॉटमोर यांना एप्रिलमध्ये बडोद्याने कोच नेमले होते. ६५ वर्षांचे अरुणलाल यांच्या मार्गदर्शनात बंगाल यंदा रणजी करंडकाचा अंतिम सामना खेळला होता. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय