PM Narendra Modi Letter to Cheteshwar Pujara retirement: भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने २४ ऑगस्ट २०२५ ला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पुजारा अनेक वर्षे भारतीय कसोटी संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू होता आणि त्याने संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतीय संघाच्या सलग दोन मालिका विजयाचा नायक पुजारा होता. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी चेतेश्वर पुजाराला पत्र लिहून त्याचे अभिनंदन केले. पुजाराने पंतप्रधान मोदींकडून मिळालेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
पुजाराचे क्रिकेटमध्ये महत्त्वाचे योगदान: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींनी पुजाराला लिहिलेल्या पत्रात म्हटले, "ऑस्ट्रेलियन भूमीवर २०१८-१९ च्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत तुझे योगदान उल्लेखनीय होते. पुजारा संघात असायचा तेव्हा चाहत्यांना नेहमीच खात्री होती की संघ सुरक्षित हातात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, विशेषतः सौराष्ट्र कडून खेळताना तू उत्तम कामगिरी केलीस. राजकोटला क्रिकेटच्या नकाशावर आणण्यात तुझे योगदान तरुणांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुझ्या क्रिकेट कारकिर्दीत कुटुंबाने मोठे योगदान आणि त्याग केला आहे. मला खात्री आहे की तुझ्या कुटुंबीयांना तुझा नक्कीच अभिमान असेल. पूजा (पुजाराची पत्नी) आणि आदिती (पुजाराची मुलगी) यांच्यासोबत तुला आता जास्त वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे याचा आनंद आहे"
"मैदानाबाहेर समालोचक म्हणून तुझी क्रिकेटची जाणीव सखोल आणि कौतुकास्पद आहे. तुझे विश्लेषण क्रिकेटप्रेमींसाठी खूप मौल्यवान आहे आणि लोक त्यांचे विचार ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मला विश्वास आहे की तू क्रिकेटशी जोडलेला राहशील आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देशील. तुला भविष्यासाठी शुभेच्छा," अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.
'मला माझ्या निवृत्तीबद्दल माननीय पंतप्रधानांकडून कौतुकाचे पत्र मिळाले आहे. यामुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटले. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल मी खूप आभारी आहे. माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पाऊल ठेवताना, मी मैदानावर घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आणि चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाची कदर करेन,' असे पुजारा म्हणाला.