PM Modi writes to cricketer Ravindra Jadeja’s wife : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा ही सध्या चर्चेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं कौतुक केलं आहे आणि पंतप्रधान मोदींनी कौतुक करणारं पत्र रिवाबाला पाठवलं आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ते सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. जडेजाच्या या पोस्टनंतर आता सर्वत्र रिवाबाचं कौतुक होतंय. जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांनी त्यांच्या मुलीच्या पाचव्या वाढदिवसाला १०१ मुलींच्या नावे पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडले होते. सुकन्या समृद्धी ही केंद्र सरकारची योजना आहे आणि जडेजा कुटुंबीयांनी १०१ मुलींच्या खात्यात प्रत्येकी ११ हजार रुपये जमा केले.
पंतप्रधान मोदींनी या दोघांच्या या कृतीचे कौतुक केले आणि समाजाप्रती तुम्ही उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे त्यांनी पत्राद्वारे म्हटले. त्यांनी असंच समाजोपयोगी काम सुरू ठेवावे असेही मोदींनी आवाहन केले.
रवींद्र जडेजा सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. त्याने येथे दोन ट्वेंटी-२०सामने खेळले. याआधी इंग्लंड दौऱ्यावर त्याने एडबस्टन कसोटीत १०४ धावा केल्या होत्या. ट्वेंटी-२०तही त्याने एका सामन्यात नाबाद ४६ धावांची खेळी केली होती.