नवी दिल्ली: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी खास भेट मिळाली. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. मात्र, या भेटीदरम्यानची एक गोष्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे आणि तिने सर्वांची मने जिंकली आहेत.
पंतप्रधान मोदींनी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंसोबत ट्रॉफीसह अनेक फोटो काढले. या फोटोंमध्ये, हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्यामध्ये उभे असतानाही पंतप्रधान मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही. त्यांनी ट्रॉफीपासून अंतर राखले. २०२४ मध्ये पुरुषांच्या विश्वचषकाला देखील मोदींनी हात लावला नव्हता. मोदींनी रोहित आणि विराटच्या मनगटाला पकडले होते.
यासंदर्भात माहितीनुसार, खेळाच्या जगतात एक अनौपचारिक परंपरा मानली जाते की, विश्वचषकासारखी मोठी ट्रॉफी स्पर्श करण्याचा अधिकार केवळ त्या खेळाडूंना असतो, ज्यांनी ती जिंकण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. खेळाडूंच्या या मेहनतीचा आणि त्यांच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दोन्हीवेळा जाणीवपूर्वक ट्रॉफीला स्पर्श करणे टाळले, असे सांगितले जात आहे.