Join us

रवींद्र जडेजाला फलंदाज म्हणून खेळविणे ही मोठी चूक; संजय मांजरेकर यांनी पुन्हा डागली तोफ

न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याला सामोरे जाताना जडेजाला स्थान देऊन फार मोठी चूक केली,असे मांजरेकरचे मत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 09:00 IST

Open in App

नवी दिल्ली : रवींद्र जडेजा याला फलंदाज म्हणून संघात निवडणे ही व्यवस्थापनाची घोडचूक ठरली,असे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकरने म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याला सामोरे जाताना जडेजाला स्थान देऊन फार मोठी चूक केली,असे मांजरेकरचे मत आहे. जडेजाने दोन्ही डाव मिळून केवळ ३१ धावा केल्या. त्याला संपूर्ण सामन्यात १५.२ षटके गोलंदाजी करता आली.

आयसीसी कसोटी खेळाडूंमध्ये नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनलेल्या जडेजावर तोंडसुख घेत मांजरेकर म्हणालेे,‘पराभवानंतर कामगिरीचे विश्लेषण होणारच. सर्वांत आधी अंतिम अकरा खेळाडूंची निवड कशी झाली,यावर विचारमंथन व्हावे.भारताने १७ जून रोजी अंतिम एकादशची घोषणा केली होती. संघात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी अष्टपैलूंना स्थान देण्यात आले. 

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर यांनी दोन फिरकीपटू निवडण्यावर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. ‘जडेजला फलंदाज म्हणून नव्हे तर डावखुरा गोलंदाज म्हणून का पसंती देण्यात आली नाही? तो फलंदाजी करणार असेल तर संघात स्थान देण्याची गरजच नव्हती. मी नेहमी याविरुद्ध बोलत राहील,’ असे मांजरेकर म्हणाले.

हनुमा विहारीला  संधी हवी होती

‘ कसोटीत तज्ज्ञ खेळाडूंना संधी मिळायला हवी. हनुमा विहारी हा फलंदाज म्हणून योग्य खेळाडू आहे.त्याला संधी मिळाली असती तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. बचाव सक्षम असलेला हनुमा विहारी संघासाठी फार उपयुक्त ठरला असता. त्याने दुसऱ्या डावात उपयुक्त योगदान दिले असते,’ असे मत मांजरेकर यांनी मांडले.

इंग्लंडविरुद्ध  चूक करू नका

जडेजा फलंदाजीत दोन्ही डावात फारसा प्रभावी ठरला नाही. गोलंदाजीतही त्याला केवळ एकदा यश मिळाले. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेची तयारी करताना व्यवस्थापनाने वारंवार चुका करु नये, असा इशारा मांजरेकर यांनी दिला.

टॅग्स :रवींद्र जडेजाभारत