PCB Loss in Champions Trophy 2025: काही दिवसांपूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफी टुर्नामेंट पार पडला. पाकिस्तानने आयोजित केलेल्या या टुर्नामेंटच्या ट्रॉफीवर भारताने नाव कोरले. 9 मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. दरम्यान, 29 वर्षांनंतर ICC स्पर्धेचे आयोजन करणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) महागात पडले आहे. दिवाळखोर पीसीबीला या आयोजनामुळे सुमारे 800 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळवून कोट्यवधी रुपयांचा फायदा होईल, असे पाकिस्तानचे स्वप्न होते. परंतु पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले. या आयोजनामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानी बोर्डाने या स्पर्धेपूर्वी स्टेडियम सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. परंतु अखेर पीसीबीला 85 टक्के नुकसान सहन करावे लागले.
पाकिस्तान क्रिकेटचे 799 कोटींचे नुकसान पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडी या तीन ठिकाणी झाले. तर भारतीय संघाने आपले सर्व सामने दुबईत खेळले. फायनलही दुबईतच झाली. टेलीग्राफच्या मते, पीसीबीने देशांतर्गत सामने आयोजित करण्यासाठी सुमारे 851 कोटी रुपये खर्च केले होते. असे असूनही, पीसीबीला फक्त 52 कोटी रुपये कमावता आले. म्हणजेच, त्यांना सुमारे 799 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, हे नुकसान भरुन काढण्यासाठी पीसीबीने आपल्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये मोठी कपात केली आहे.
पाकिस्तानी संघाने एकही सामना जिंकला नाहीमायदेशात झालेल्या या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने लज्जास्पद कामगिरी केली. पाक संघ 5 दिवसात एकही सामना न जिंकता बाहेर पडला. संघाला ग्रुप स्टेजच्या पुढे जाता आले नाही.