गाले : सहा वर्षांआधीच्या दौऱ्यात ३-० ने अनपेक्षित पराभव पत्करावा लागल्याच्या जखमा ताज्या असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने फिरकीला अनुकूल अशा गवताळ खेळपट्ट्यांवर सामना करण्यास सज्ज असल्याचे मत व्यक्त केले. बुधवार, २९ जूनपासून श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे.
ऑस्ट्रेलियाला भारतीय उपखंडातील मंद खेळपट्ट्यांवर फिरकीचा सामना करताना नेहमी त्रास झाला. तथापि सध्याच्या याच संघाने मार्चमध्ये पाकिस्तान दौऱ्यात तीन सामन्यांची मालिका १-० ने खिशात घातली होती. लंका संघात सहा वर्षांआधी रंगना हेरथ आाणि दिलरुवान परेरासारखे फिरकी गोलंदाज होते. दोघांनी मालिकेत ४३ गडी बाद केले होते. लंकेच्या सध्याच्या संघात मात्र अनुभवी फिरकी गोलंदाज नाहीत. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३१ पैकी चारच सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने १९ कसोटीत विजय साजरा केला.
कमिन्सने पाकिस्तान आणि श्रीलंका येथील परिस्थितीची तुलना करताना सांगितले की, दोन्ही देशातील परिस्थिती भिन्न आहे. पाकमध्ये चेंडू अधिक वळण घेत नाही. तेथे आम्ही सामन्यांवर पकड मिळविली. येथे काही प्रमाणात आव्हान प्रबळ वाटते. लंकेचा संघ लसिथ एम्बुलडेनिया आणि प्रवीण जयविक्रमा तसेच ऑफ स्पिनर रमेश मेंडिससह मैदानात उतरू शकतो. जेफ्री वांडरसे हादेखील पर्याय आहे.
ऑस्ट्रेलियाचा फजरकी मारा देखील भक्कम आहे. नाथन लियोनने १०८ कसोटीत ४२७ गडी बाद केले आहेत. लेगस्पिनर मिशेल स्वेपसन हादेखील संघात असेल. लंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या कामगिरीकडे अंगुली निर्देश करीत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.