Join us

अ‍ॅशेसचा थरार!! शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दोन विकेट्सने विजय

पहिल्या कसोटी कांगारू वरचढ! पॅट कमिन्स-नॅथन लायन जोडीने जिंकवला सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 09:53 IST

Open in App

Ashes 2023, ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करून अ‍ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी रोमांचक पद्धतीने जिंकली. इंग्लिश संघाचा विश्वविजेत्या संघाविरुद्ध २ विकेट्सने पराभव झाला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. 227 धावांवर संघाच्या 8 विकेट पडल्या होत्या. यानंतर कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने संघाला सामना जिंकवून दिला. 2005 मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात 282 धावांचे लक्ष्य मिळाले होते. तेव्हा संघाने तो सामना 2 धावांनी गमावला होता, पण यावेळी त्यांनी बदला घेतला.

पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी ऑस्ट्रेलियासाठी नाबाद 55 धावांची भागीदारी केली. कर्णधार कमिन्सने 73 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. तर लायनने 16 धावांचे योगदान दिले. 227 धावांवर 8 विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत असल्याचे वाटत होते, पण या दोन्ही गोलंदाजांनी संघाला विजयापर्यंत नेले.

शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात पाऊस झाला

सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 174 धावांची गरज होती आणि इंग्लंडला 7 विकेट्सची गरज होती. सकाळचे सत्र पावसामुळे वाया गेल्याने लंच ब्रेक लवकर झाला. दिवसभरात 67 षटकांचा खेळ होईल असे सांगण्यात आले. ऑस्ट्रेलियाने दिवसाची सुरुवात 3 बाद 107 अशी केली. ख्वाजा आणि नाईट वॉचमन स्कॉट बोलँड यांनी डावाची धुरा सांभाळली. स्टुअर्ट ब्रॉडने दिवसाच्या आठव्या षटकात बोलंडला यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करून ही भागीदारी मोडली.फॉर्ममध्ये असलेला ट्रेव्हिस हेड फार काळ टिकू शकला नाही आणि त्याने 16 धावा केल्या आणि ऑफस्पिनर मोईन अलीच्या चेंडूवर जो रुटने झेल घेतला आणि ऑस्ट्रेलियाची पाच बाद 143 अशी अवस्था झाली. चहापानाच्या विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियाला तीन मोठे धक्के बसले. कॅमेरून ग्रीन 28 धावा करून रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. बेन स्टोक्सने उस्मान ख्वाजाला बाद केले. तो ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा झटका होता. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या ख्वाजाने दुसऱ्या डावात ६५ धावांचे योगदान दिले. एलेक्स कॅरीलाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कमिन्स-लायन जोडीने सामना जिंकवला.

इंग्लंडला डाव घोषित करावा लागला

या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने 8 बाद 393 धावा केल्या होत्या. जो रुट संघाकडून शतक झळकावत खेळत होता. यानंतरही कर्णधार बेन स्टोक्सने पहिल्याच दिवशी डाव घोषित केला. संघाला अधिक धावा करण्याची संधी होती, पण तसे झाले नाही. नंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा केल्या. इंग्लंडचा दुसरा डाव 273 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर 281 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ते त्यांनी पूर्ण केले.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019इंग्लंडआॅस्ट्रेलिया
Open in App