IPL 2024, MI vs SRH : मुंबई इंडियन्सने ३ फलंदाज ३१ धावा अशा परिस्थितीतून पुनरागमन करताना काल सनरायझर्स हैदराबादला नमवले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी शानदार १४३ धावांची भागीदारी करून या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मुंबईने १७.२ षटकांत ३ बाद १७४ धावा करून मॅच जिंकली. सूर्या ५१ चेंडूंत १२ चौकार व ६ षटकारांसह १०२ धावांवर नाबाद राहिला आणि तिलकसह ( नाबाद ३७) ७९ चेंडूंत १४३ धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. गोलंदाजीत हार्दिक पांड्या व पियूष चावला यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेऊन SRH ला १७३ धावांपर्यंत रोखले होते. या सामन्यानंतर SRH चा कर्णधार पॅट कमिन्स आणि MI चा कर्णधार हार्दिक पांड्या व सूर्या यांच्यात चर्चा रंगलेली दिसली.
पॅट कमिन्सने त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग कसा कापला गेला, याची माहिती पांड्या व सूर्याला दिली. ते समजताच दोघांना धक्का बसला आणि हार्दिकची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. हार्दिकने कमिन्सला त्याच्या बोटाबाबत विचारले. कमिन्सने त्यांना आपले कापलेले बोट दाखवताच हार्दिक आणि सूर्या दोघेही अवाक झाले होते.
लहानपणी झालेल्या अपघातात कमिन्सने उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग गमावला. त्याच्या बहिणीने जोरदार दरवाजा बंद केला आणि त्यात कमिन्सचे बोट त्यात अडकले आणि तो वरचा भाग तुटला.
सनरायझर्स हैदराबादचा ११ सामन्यातील हा पाचवा पराभव ठरला आणि आता त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. हैदराबादचा हा मागील चार सामन्यांतील तिसरा पराभव ठरला आहे आणि त्यामुळे संघाची डोकेदुखी वाढलीय.
मुंबईने बाजी मारल्याचा पहिला फायदा हा CSK ला झाला आणि ते तिसऱ्या क्रमांकावर कायम राहीले. शिवाय लखनौ सुपर जायंट्स ( ११ सामने) आणि हैदराबाद मग समान रेषेत आले. अशा परिस्थितीत LSG व SRH यांच्यात नेट रन रेटची मारामारी होईल.