Join us  

'...तर धोनीला भारतीय संघात स्थान मिळालंच नसतं'

महेंद्र सिंह धोनीबद्दल महत्त्वपूर्ण विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 2:52 PM

Open in App

मुंबई: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दल यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलनं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. आम्ही खराब खेळ केला नसता, तर धोनीला कधीही भारतीय संघात स्थान मिळालं नसतं, असं पटेलनं म्हटलं आहे. भारतीय संघात धोनीची निवड होण्यापूर्वी पार्थिव पटेलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी होती. 'त्यावेळी भारतीय संघात संधी मिळालेल्या यष्टिरक्षकांना चांगली कामगिरी करता आली नाही. तेव्हाच्या यष्टिरक्षकांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला असता, तर भारतीय संघात धोनीची निवड झाली नसती,' असं पार्थिव पटेलनं म्हटलं. 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात पार्थिव पटेलनं धोनीवर भाष्य केलं. 'तू चुकीच्या वेळी क्रिकेट विश्वात आलास असं वाटतं का?' असा प्रश्न पार्थिवला विचारण्यात आला होता. यावर बोलताना, मला असं वाटत नाही, असं उत्तर त्यानं दिलं. 'तू चुकीच्या वेळी भारतीय क्रिकेट विश्वात आलास, असं मला खूप लोक म्हणतात. पण मी याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. आम्ही वाईट खेळलो नसतो, त्यावेळच्या यष्टीरक्षकांनी सुमार कामगिरी केली नसती, तर धोनीला संघात स्थानच मिळालं नसतं,' असं पटेलनं म्हटलं. आम्ही संघाबाहेर गेलो, याला धोनी जबाबदार नसून आम्हीच जबाबदार आहोत, असं पार्थिव पटेल म्हणाला. 'आम्ही जर संधीचा योग्य फायदा घेतला असता, तर कदाचित धोनीला संघात स्थानच मिळालं नसतं,' असं त्यानं म्हटलं. या मुलाखतीत पार्थिव त्याच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या टप्प्याबद्दलदेखील मोकळेपणानं बोलला. शालेय जीवनात सायकलवरुन 12-13 किलोमीटरचा प्रवास करुन आपण क्रिकेट प्रशिक्षणासाठी जायचो, अशी आठवण त्यानं यावेळी सांगितली.  

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीक्रिकेटभारत