लाहोर - पाकिस्तान संघ पोकळ धमक्या देत असला तरी तो भारताच्या यजमानपदाखाली दि. ७ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या आयसीसी टी-२० विश्वषचकात निश्चितपणे खेळणार आहे. त्यासाठी दि. २ फेब्रुवारी रोजी हा संघ कोलंबोकडे प्रस्थान करेल. पीसीबीने बहिष्काराचे शस्त्र म्यान केल्याचे निष्पन्न झाले असून, १५ फेब्रुवारीचा भारत-पाक सामनादेखील पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असे बोर्डाच्या सूत्रांनी गुरुवारी स्पष्ट केले. सूत्रांनी पुढे सांगितले की, ‘पीसीबीने दि. २ फेब्रुवारीला सकाळी कोलंबोसाठी रवाना होण्यासाठी प्रवासाची सर्व तयारी आधीच पूर्ण केली आहे. भारतात खेळण्याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या ‘सुरक्षा चिंते’ला पीसीबीने पूर्ण पाठिंबा दर्शविला. त्याच वेळी आयसीसीमधील आपली स्थिती धोक्यात न घालता यापेक्षा पुढे काही करता येणार नाही.
बीसीसीआय, पीसीबी आणि आयसीसी यांच्यात त्रिपक्षीय करार आहे. याअंतर्गत २०२७ पर्यंत आयसीसी स्पर्धांतील भारत-पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ स्थळी खेळवले जातील. सूत्रांनी पुढे सांगितले, ‘विशेष बाब अशी की पाकिस्तानला विश्वचषकातील पूर्ण सामने श्रीलंकेत खेळायचे आहेत. संघ अंतिम फेरीत पोहोचला तरी अंतिम सामना तिथेच होईल. अशा परिस्थितीत स्पर्धेचा किंवा भारताविरुद्धच्या सामन्याचा बहिष्कार करण्याचा आधार काय असू शकतो?’
पीसीबी आज शुक्रवारी आपल्या सहभागाविषयी औपचारिक घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. माध्यमांच्या मते, पाकिस्तान स्पर्धेतून माघार घेऊ शकतो किंवा भारताविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकतो, अशा अफवा होत्या. मात्र, त्यावर विश्वास ठेवू नये, असे सूत्रांनी म्हटले आहे.
पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, सर्व निर्णय पाकिस्तान क्रिकेटच्या स्थिर आणि मजबूत भविष्यासाठी घेतले जातील आणि आयसीसी तसेच इतर सदस्य बोर्डांशी चांगले संबंध कायम ठेवले जातील. अशावेळी विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा आणि भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
सूत्रांनी पुढे म्हटले की, ‘भारत सरकारने संघाला पाकिस्तानमध्ये खेळण्याची परवानगी दिलेली नाही; मात्र आशिया चषक स्पर्धा किंवा आयसीसी विश्वचषकात तटस्थ स्थळी भारत-पाकिस्तान सामने खेळवण्यावर कोणतीही बंदी नाही.’
दुसरीकडे पाकिस्तान सरकार स्वतः सातत्याने खेळाला राजकारणापासून दूर ठेवावे, असे सांगत आहे. मग भारताविरुद्धच्या सामन्याचा बहिष्कार कसा योग्य ठरवला जाऊ शकतो?’