Pakistani Cricketer Haider Ali Rape Case : पाकिस्तानी क्रिकेटपटू हे नेहमीच वेगवेगळ्या वादग्रस्त प्रकरणात अडकल्याचे दिसते. गेल्या महिन्यात पाकिस्तानकडून ३५ टी२० सामने खेळणारा हैदर अली याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. तो इंग्लंडमध्ये सामना खेळण्यासाठी गेला होता. लंडनच्या कॅन्टरबरी मैदानावर मेलबर्न क्रिकेट क्लबविरुद्ध खेळण्यासाठी आला होता, तेव्हा ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी त्याला भर मैदानातून उचलले. एका मुलीने या खेळाडूवर बलात्काराचा आरोप केला होता. आता लंडन न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला आहे.
हैदर अलीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीवर एका ब्रिटिश-पाकिस्तानी मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. वृत्तानुसार, पुराव्याअभावी न्यायालयाने हा खटला रद्द केला. फौजदारी कायदा तज्ज्ञ बॅरिस्टर मोईन खान यांनी अलीची बाजू मांडली. मँचेस्टरमधील एका हॉटेलमध्ये एका ब्रिटिश-पाकिस्तानी महिलेने हैदर अलीवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यादरम्यान, २४ वर्षीय अलीला मँचेस्टर पोलिसांनी अटक केली होती.
मुलीची तक्रार काय?
मुलीने पोलिसांना सांगितले होते की, २३ जुलै २०२५ रोजी मँचेस्टरमधील एका हॉटेलमध्ये तिची हैदर अलीला पहिली भेट झाली होती. त्यानंतर, दोघेही १ ऑगस्ट रोजी अॅशफोर्डमध्ये पुन्हा भेटले. पहिल्या भेटीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी महिलेने तक्रार दाखल केली. पण त्यातून तो निर्दोष मुक्त झाला आहे. त्यामुळे पोलिसांचे म्हणणे आहे की हैदर अली आता कुठेही जाण्यास मोकळा झाला आहे. त्याच्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. त्याला पोलिस स्टेशनकडून त्याचा पासपोर्ट आधीच मिळाला आहे आणि तो त्याच्या मर्जीनुसार इंग्लंड सोडून जाऊ शकतो.
हैदर अली यांनी आरोप फेटाळले होते
या प्रकरणात, हैदर अलीने सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळून लावले होते. त्याने तपास पथकाला सांगितले की, तो त्या महिलेला ओळखतो आणि ते एकमेकांना ओळखतात, परंतु त्याने महिलेशी काहीही चुकीचे केले नाही. पोलिसांनी अलीला अटक केल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला तात्पुरते निलंबित केले होते. त्याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता प्रकरणाचा निकाल आल्यानंतर पाक क्रिकेट बोर्ड त्याचे निलंबन मागे घेणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.