पाकिस्तान संघाचा फिरकीपटू यासिर शाह ( Yasir Shah) हा मोठ्या संकटात अडकताना दिसतोय. पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि त्याच्या मित्रावर १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आणि तिला धमकी देण्याचा आरोप करण्यात आला असून इस्लामाबाद शालीमार पोलीस स्थानकात FIRची नोंद झाली आहे. पोलीस या मुलीची मेडिकल टेस्ट करण्याच्या तयारीत आहेत, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार यासिर शाहचा मित्र फरहान यानं १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आणि त्याचा एक व्हिडीओही तयार केला. त्यानंतर त्यानं त्या मुलीचं यासिरशी बोलणं केलं. FIR नुसार, यासिरनं या मुलीला गप्प राहण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे तर त्यानं त्या मुलीवर फरहानशी लग्न करण्याचा दबाव टाकला. आता त्या मुलीची वैद्यकिय चाचणी केली जाणार आहे.
यासिर शाहच्या आधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. बाबरवरील आरोप अजूनही सिद्ध झालेले नाहीत. दुखापतीमुळे यासिर शाह बांगलादेश दौऱ्यावर गेला नाही. पाकिस्ताननं ती मालिका २-० अशी जिंकली. ३५ वर्षीय यासिर शाहनं ४६ कसोटीत २३५ विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं विधान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यावर भाष्य केलं की, आमच्या करारबद्ध खेळाडूवर गंभीर आरोप केल्याचे वृत्त आम्हालाही समजले आहे. PCB याबाबत अधिक माहिती जाणून घेत आहे आणि तथ्य जाणून घेतल्यानंतरच त्यावर आम्ही मत मांडू.