बाबर आझमकडे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा एकदा बाबरच्या नेतृत्वात असणार आहे. अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) शाहीन शाह आफ्रिदीची हकालपट्टी करून बाबरवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. अशातच बाबरबद्दलचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक नाही तर दोन पाकिस्तानी अभिनेत्री बाबरला भावाच्या भूमिकेत उच्चारताना त्याची खिल्ली उडवतात. पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष रमीझ राजाचा शो असलेल्या 'शोटाइम विथ रमीज'मधील आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, रमीझसोबत दोन कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या पाहुण्या आहेत. रमीझ राजा अभिनेत्रींना विचारतो की, तुम्ही बाबर आझमला कोणती भूमिका द्याल? यावर अभिनेत्री म्हणते की, भावाची भूमिका तर दुसरी सांगते की, बिनकामाचा भाऊ या भूमिकेत बाबर चांगला दिसेल. रमीझ राजा बाबर आझमला स्क्रीनवर दाखवत विचारतो की, हा बाबर आझम आहे, तो पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार आहे. त्याला तुम्ही कोणती भूमिका द्याल? अभिनेत्रीने यावर 'भावाची भूमिका' असे म्हणताच रमीझसोबत असलेली होस्टही अवाक् होते आणि म्हणते की, तो तुला हिरो वाटत नाही का?
२०२३ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या वन डे विश्वचषकानंतर बाबरने तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. पण त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले. अलीकडेच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतून बाबर आझमचे कर्णधार म्हणून पुनरागमन झाले.