Join us
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, 'मिशन वर्ल्ड कप'साठी पाकिस्तानी संघाला टिप्स

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानने 15 सदस्यीय संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 17:30 IST

Open in App

कराची : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानने 15 सदस्यीय संघ जाहीर केला. पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व सर्फराझ अहमदकडे सोपवण्यात आले आहे. या संघात शोएब मलिक आणि मोहम्मद हफिझसारखे अनुभवी खेळाडू आहे. पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरला मात्र विश्वचषकासाठीच्या संघात निवडण्यात आलेले नाही. पाकिस्तानच्या या वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघातील सदस्यांनी शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी यावेळी वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांचा अनुभव खेळाडूंशी शेअर केला आणि वर्ल्ड कप विजयासाठी काही खात टिप्सही दिल्या.इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने 1992 सालचा वर्ल्ड कप जिंकला होता. पाकिस्तानने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंड संघावर 22 धावांनी विजय मिळवत वर्ल्ड कप नावावर केला होता. त्या स्पर्धेतील अनुभव खान यांनी पाक संघातील खेळाडूंना सांगितला. यावेळी निवड समिती प्रमुख इंझमाम-उल-हक, मुख्य प्रशिक्षक मिकी ऑर्थर हेही उपस्थित होते. इंग्लंडविरुद्ध एक ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ 23 एप्रिलला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. 

वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. 31 मे ला त्यांचा पहिला सामना वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. 

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ- सर्फराझ अहमद (कर्णधार), इमाम उल हक, बाबर आझम, फखर जमान, आबिद अली, जुनैद खान, मोहम्मद हफीज, फहीम अशरफ, मोहम्मद हुसैन, शादाब खान, हारिस सोहेल, शाहीन आफ्रिदी,  हसन अली, शोएब मलिक, इमाद वसीम. 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९पाकिस्तानइम्रान खान