Join us

पाकिस्तानी गोलंदाजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप! USA ला हरवण्यासाठी रडीचा डाव?

अमेरिकेच्या संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी ऐतिहासिक विजय नोंदवताना पाकिस्तानचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:38 IST

Open in App

अमेरिकेच्या संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी ऐतिहासिक विजय नोंदवताना पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानचे खेळाडू कागदावरच वाघ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या सामन्यात अमेरिकेने सांघिक कामगिरी करून सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला... क्षेत्ररक्षणातील गचाळपणा, दिशाहीन गोलंदाजी आणि फलंदाजांनी हाराकिरी हे पाकिस्तानच्या पराभवाची कारणं ठरली. अमेरिकेसारख्या दुबळ्या संघाला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानला घाम गाळावा लागला. त्यात पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ ( Haris Rauf ) याच्यावर Ball Tampering अर्थात चेंडूशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप आता करण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज रस्टी थेरॉन, जो सध्या अमेरिकेच्या वरिष्ठ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे, त्याने सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) टॅग करत पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज रौफवर गंभीर आरोप केले आहेत. USA विरुद्धच्या सामन्यात रौफला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्याने ४ षटकांत ३७ धावा देताना फक्त १ विकेट घेतली. थेरॉनने असा दावा केला की वेगवान गोलंदाजाने नवीन चेंडू नखाने कुडतडला.. 

थेरॉनने X वर लिहिले आहे की,"ICC, पाकिस्तानी गोलंदाज चेंडूशी छेडछाड करत नाही असा समज आम्ही करून घेऊ का? दोन षटकांपूर्वी बदललेला चेंडू रिव्हर्स कसा होऊ शकतो? हॅरिस रौफने त्याच्या नखाने चेंडू कुडतडला आहे आणि त्याचे पुरावे तुम्हाला चेंडूवर दिसू शकतील.''  अमेरिकेच्या टीमकडून याबबात कोणतीच अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही, परंतु रौफवर करण्यात आलेला आरोप हा गंभीर आहे. 

बाबर आजम ( ४४) , शादाब खान ( ४०) व शाहीन आफ्रिदी ( २३) यांच्या योगदानामुळे पाकिस्तानने १५९ धावा उभ्या केल्या, त्याला अमेरिकेकडून मोनांक पटेल ( ५०), अँड्रीस गौस ( ३५), आरोन जोन्स ( ३६*) आणि नितीश कुमार ( १४*) यांनी सडेतोड उत्तर दिले. नितीशने शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये खेचला. अमेरिकेने त्यात १८ धावा केल्या आणि पाकिस्तानला १ बाद १३ धावाच करता आल्या. पाकिस्तानचा पुढील सामना ९ जून रोजी भारताविरुद्ध होणार आहे.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024पाकिस्तानअमेरिकाआयसीसी