२८ ऑगस्टला आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांची लढत पाहण्यासाठी चाहते उत्सुकही झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेभारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरबद्दल एक किस्सा सांगितला आहे.
पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने स्टार स्पोर्ट्सवर आयोजित एका कार्यक्रमादरम्यान एक किस्सा सांगितला. सचिन तेंडुलकर कोण आहे आणि त्याचं स्टेटस काय आहे हे मला माहित नव्हते, असे शोएब अख्तर म्हणाला. यानंतर सकलेन मुश्ताकनं मला सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात मोठा फलंदाज असल्याचे सांगितले, असे शोएब हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना म्हणाला.
“मी आपल्याच जगात का वावरत होतो, त्यामुळे मला हे माहितच नव्हते. समोर कोणता फलंदाज आहे हे मी पाहत नव्हतो. फक्त किती जलद गोलंदाजी करता येईल हे मी पाहत होतो. जर बॉल स्विंग होत असेल तर जलद गोलंदाजी केव्हा करायची यावर आमचं लक्ष असायचं,” असं त्यानं सांगितलं. जोपर्यंत तुम्ही पाकिस्तानला मॅच जिंकवून देणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्टार बनणार नाही. यासाठी आमचा प्रयत्न संघाला मॅच जिंकवून देण्याचाच असल्याचं त्यानं स्पष्ट केलं.
आशिया चषक स्पर्धेत टी २० फॉर्मेटमध्ये सामने खेळवले जातील. यावेळी आशिया चषक स्पर्धा ही युएईमध्ये खेळवली जाणार आहे. २७ ऑगस्टपासून या स्पर्धेची सुरूवात होईल आणि २८ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता भारत पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे.