सिडनी : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न निवृत्तीनंतरही आपल्या गुगलीने अनेकांची विकेट घेत आहे. 'नो स्पिन' या आत्मचरित्रातून त्याने अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्याने केलेला असाच एक खळबळजनक दावा समोर आला आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने खराब गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला 2 लाख डॉलर्सची ऑफर दिल्याचा दावा त्याने केला आहे. 1994च्या कराची कसोटीची ही घटना आहे.
तो म्हणाला,'' 1994 च्या कराची कसोटीत पाकिस्तानच्या सलीम मलिक माझ्या रुममध्ये आला. त्याने मला अर्धा तासासाठी खराब गोलंदाजी करण्यासाठी 2 लाख डॉलर्सची ऑफर दिली." मलिकवर फिक्सिंगच्या आरोपाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही माक्र वॉ आणि टीम मे यांनी 1995 साली मलिकने सामना हरण्यासाठी ऑफर दिल्याचा दावा केला होता. पाकिस्तानमधील बुकी सलिम पर्वेझनेही पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामना फिक्स करण्यासाठी मलिकने 42.5 लाख दिल्याचे पाकिस्तानच्या न्यायालयासमोर कबुल केले होते.
वॉर्न पुढे म्हणाला की,''श्रीलंका दौऱ्यावरही मला बुकींकडून पैशांची ऑफर आली होती. मी एका कॅसिनोमध्ये 5000 डॉलर हरलो होतो. तेव्हा तेथे उपस्थित एका व्यक्तीने मला 5000 डॉलर देऊ केले आणि त्याबदल्यात त्याने सामना फिक्स करण्यास सांगितले. मी स्पष्ट शब्दात त्याला नकार दिला."