Haris Rauf Catch Drop Video: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या षटकात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाने ५० षटकात ९ बाद २३९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाने ४९.३ षटकात हे लक्ष्य पार केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली. आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने ८६ धावांची खेळी केली. तर पाकिस्तानकडून सैम अयुबने शतकी (१०९) खेळी केली. पाकिस्तानने जरी सामना जिंकला असला तरीही नेटकऱ्यांना त्यांना फिल्डिंगसाठी ट्रोल करण्याची संधी मिळालीच. हॅरिस रौफने एक अतिशय सोपा झेल सोडल्याने सोशल मीडियावर पाकिस्तानची पुन्हा एकदा खिल्ली उडवली गेली.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना तळाचा फलंदाजी मार्को यान्सेन फलंदाजी करत होता. फिरकीपटू अबरार अहमद याने चेंडू टाकला. मार्को यान्सेनने तो चेंडू हवेत मारला. चेंडू फार वेगात नव्हता त्यामुळे फार दूर गेला नाही. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्याने चेंडू हवेत उडवला होता. हॅरिस रौफसाठी तो अतिशय साधा झेल होता. पण पाकिस्तानी खेळाडूंची फिल्डिंग हा कायमच विनोदाचा विषय असतो. तसेच घडले. अतिशय सोपा झेल हॅरिस रौफने सोडला आणि जमिनीवर पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हॅरिस रौफची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली.
दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या दक्षिण सुरूवात फारशी चांगली झाली नव्हती. टोनी झॉर्झी (३३), रायन रिकल्टन (३६), एडन मार्करम (३५), रॅसी डुसेन (८), ट्रिस्टन स्टब्स (१) हे पाच महत्त्वाचे फलंदाज फ्लॉफ ठरले. हेनरिक क्लासेन मात्र एका बाजुने झुंज देत होता. त्याने ९७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने त्याला अजिबात साथ मिळाली नाही. अखेर ९ गड्यांच्या मोबदल्यात आफ्रिका २३९ धावा करु शकली. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातही फसली. ४ बाद ६० अशी धावसंख्या असताना सलामीवीर सैम अयुब आणि सलमान अली आघा यांच्यात १४० धावांची भागीदारी झाली. सैम अयुबने ११९ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह १०९ धावा केल्या. तो बाद झाल्यावर सलमान आघाने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. त्याने ९० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या.