Babar Azam MS Dhoni, Pak vs SA: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा सामना १९ डिसेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने शानदार कामगिरी करत ८१ धावांनी सामना जिंकला. तसेच, पाकिस्तानने मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडीही घेतली. या सामन्यात बाबर आझम दमदार अर्धशतक ठोकले. त्याने केलेल्या ७३ धावांच्या खेळीच्या जोरावर त्याने भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडीत काढला. तसेच आणखीही काही विक्रम प्रस्थापित केले.
बाबर आझमने मोडला धोनीचा विक्रम
या सामन्यात बाबर आझमने ९५ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. अर्धशतक झळकावून त्याने धोनीचा मोठा विक्रम मोडला. बाबर आझमने SENA Countries म्हणजे सेना देशांविरुद्ध {दक्षिण आफ्रिका (S), इंग्लंड (E), न्यूझीलंड (N), ऑस्ट्रेलिया(A)} अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकले. धोनीने आपल्या कारकिर्दीत ३८ अर्धशतके झळकावली आहेत. पण आता बाबरची सेना देशांत एकूण ३९ अर्धशतके झाली आहेत.
बाबरचे आणखीही काही विक्रम
बाबर आझम पाकिस्तानकडून सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने पाकिस्तानकडून खेळताना तीनही फॉरमॅट मध्ये मिळून एकूण १२९ शतके ठोकली आहेत. तर बाबर आजम आणि मोहम्मद युसूफ हे दोघेही ९५ अर्धशतकांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याशिवाय २०२४ या वर्षात एक हजार धावांचा टप्पाही त्याने पार केला. त्याने ३३ सामन्यांच्या ३६ डावांत ३२ च्या सरासरीने १ हजार ६२ धावा केल्या.
पाकिस्तानची मालिकेत आघाडी
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्वबाद ३२९ धावा केल्या. बाबर (७३) शिवाय कर्णधार मोहम्मद रिझवानने ८० तर कामरान गुलामने ६३ धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव सर्वबाद २४८ धावांवर आटोपला आणि पाकिस्तानने सामना जिंकला.