Pakistan Cricket unwanted record: पाकिस्तानी संघ सध्या फारच बिकट परिस्थितीत आहे. क्रिकेटचा कुठलाही फॉरमॅट असो, पाकिसतानी संघाच्या पदरी निराशाच येताना दिसतेय. वनडे वर्ल्डकप, टी२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी तिनही बड्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानी संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. मध्यंतरीच्या काळात अमेरिका सारख्या नवख्या संघानेही पाकिस्तानला पराभूत केले. या साऱ्या घटनांमुळे पाकिस्तानी संघाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं. तशातच आता पाकिस्तानी संघाने एक नकोसा विक्रम केला असून त्यांची तुलना थेट झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाशी केली जात आहे.
१०० टी२० हरणाऱ्या यादीत पाकिस्तानचा लागला नंबर
टी२० क्रिकेटमध्ये एकेकाळी दबदबा असणाऱ्या पाकिस्तानी संघाची सध्या अवस्था म्हणजे 'कोण होतास तू, काय झालास तू' अशी झाली आहे. नुकताच पाकिस्तानी संघाने अतिशय लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे. १०० टी२० आंतरराष्ट्रीय सामने हरणारा पाकिस्तान हा जगातील पाचवा संघ बनला आहे. आतापर्यंत या यादीत वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बांगलादेश या संघांचा समावेश होता. मात्र आता पाकिस्तानचा संघही या यादीत जाऊन बसला आहे. १८ मार्चला झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानचा या यादीत समावेश झाला.
पाकिस्तानी संघाविरूद्ध न्यूझीलंडने ड्युनेडिन येथील सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंडच्या भूमीवर पाकिस्तानने पराभवाचे शतक गाठले. पावसामुळे सामना १५-१५ षटकांचा खेळला गेला. पाकिस्तानी संघाने ९ गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना १३.१ षटकात ५ गडी गमावून न्यूझीलंडने सामना जिंकला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघाने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
सर्वाधिक टी२० सामने हरणाऱ्या संघांची यादी
- वेस्ट इंडीज - १०९
- बांग्लादेश - १०७
- श्रीलंका - १०६
- झिम्बाब्वे - १०३
- पाकिस्तान - १००
Web Title: Pakistan Cricket Team unwanted record most t20 matches lost 100 matches lost PAK vs NZ
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.