Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाक मंडळाची श्रीलंकेकडे अजब मागणी, कसोटी मालिका खेळायचीय तर खर्च उचला

श्रीलंका क्रिकेट संघानं नुकतीच पाकिस्तानात ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:42 IST

Open in App

श्रीलंका क्रिकेट संघानं नुकतीच पाकिस्तानात ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळली. 2009मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने झाले नव्हते. एक दोन सामने वगळता, पाकिस्तानात मोठा संघ येण्याची ही पहिलीच वेळ होती. ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेनंतर आता पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( पीसीबी) श्रीलंकेसोबत कसोटी मालिका खेळवण्यास उत्सुक आहे. पाकिस्ताननं कसोटी मालिकेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. पण, त्याचवेळी श्रीलंकेला ही कसोटी मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळायची असल्यास त्यांनी खर्च उचलावा, अशी अजब मागणी पीसीबीनं केली आहे.

संयुक्त अरब अमिरातीतील कसोटी मालिकेचा खर्च उचलण्यास पीसीबी तयार नाही. पीसीबीचे म्हणणे आहे की,''श्रीलंकेचा संघ कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर येण्यास उत्सुक नसेल आणि ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे व्हावी, अशी त्यांची इच्छा असेल, तर त्यांनी पीसीबीसोबत मिळून मालिकेचा खर्च उचलावा.'' 

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेने डिसेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर यावे, अशी पीसीबीची इच्छा आहे. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीसाठी दुबईत आले होते. तेव्हा त्यांनी श्रीलंकेच्या प्रतिनिधिंशी कसोटी मालिकेबाबत चर्चा केली. ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळवायची झाल्यास, त्यांनी खर्च उचलावा असेही पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी श्रीलंकेच्या प्रतिनिधिंना सांगितले.

टॅग्स :पाकिस्तानश्रीलंकाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा