टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघातून बाबर आझमसह स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नुकतीच पाकिस्तान क्रिकेट संघाने बांगलादेश दौऱ्यासाठी वनडे संघाची घोषणा केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ निवडताना स्टार खेळाडूंना दणका देत ६ नव्या चेहऱ्यांवर भरवसा दाखवल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाबर आझमसह या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
पाकिस्तानचा संघ ११ ते १५ या कालावधीत बांगलादेश दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिके खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने बांगलादेश येथील ढाका येथील शेरे-बांग्ला नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. वनडे संघाचे नेतृत्व शाहीन शाह आफ्रिदीकडे सोपवण्यात आले आहे. बाबर आझमसह सईम अयूब आणि फखर झमान या स्टार खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही. बाबर आझमनं आपला अखेरचा वनडे सामना मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. या मालिकेत त्याने शतकी खेळीही केली होती. पण टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील खराब फॉर्ममुळे त्याच्या वनडेतील कामगिरीकडे दुर्लक्ष करत थेट त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
१५ सदस्यीय संघात ६ नवे चेहरे
पाकिस्तानच्या संघाने बांगलादेशविरुद्ध निवडलेल्या १५ सदस्यीय संघात अब्दुल समद, माज सदाकत, मोहम्मद गाजी घोरी, साद मसूद, साहिबजादा फरहान आणि शमील हुसेन यांना पहिल्यांदाच वनडे संघात स्थान दिले आहे. साहिबजादा फरहान याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. नव्या चेहऱ्यांना संधी देत पाकिस्तान संघाने नवी संघ बांधणीची सुरुवात केल्याचे दिसते. हा डाव कितपत यशस्वी ठरणार ते पाहण्याजोगे असेल.
बांगलादेश दोऱ्यातील वनडे मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ :
शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फैसल अकरम, हारिस राऊफ, हुसैन तलत, माज सदाकत, मोहम्मद रिझवान (विकेट कीपर), मोहम्मद वसीम ज्यूनिअर, मुहम्मद गाजी गोरी (विकेट कीपर), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा आणि शमील हुसैन.
पाकिस्तान संघाचे वनडे शेड्यूल
- ११ मार्च - पहिला वनडे सामना, ढाका
- १३ मार्च - दुसरा वनडे सामना, ढाका
- १५ मार्च - तिसरा वनडे सामना, ढाका