Pakistan Champions vs India Champions, 1st Semi Final : युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील इंडिया चॅम्पियन्स संघाने WCL 2025 च्या दुसऱ्या हंगामातील सेमी फायनलचं तिकीट पक्के केले आहे. सलग दुसऱ्यांदा फायनल गाठण्यासाठी आता भारतीय लीजेंड्स समोर पाकिस्तान संघाचे आव्हान असणार आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साखळी फेरीत भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तान संघा विरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. पण आता जे नको तेच घडलं आहे. गत हंगामातील फायनलिस्ट सेमीफायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. आशिया कप स्पर्धेत भारत-पाक सामना होणार हे स्पष्ट झाल्यानंतर WCL 2025 स्पर्धेत कोणताही वाद निर्माण न होता, दोन्ही संघ मैदानात उतरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये काटावर पास
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स या स्पर्धेतील पाच सामन्यात भारतीय संघाने फक्त एक सामना जिंकला आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना रद्द झाल्यावर भारतीय संघाच्या खात्यात १ गुण जमा झाला होता. सेमीफायनलमधील एन्ट्री पक्की करण्यासाठी वेस्ट इंडिज विरुद्ध उत्तम धावगतीने जिंकण्याचे चॅलेंज युवराज सिंगच्या इंडिया चॅम्पियन्स संघासमोर होते. रन रेटचं गणित लक्षात ठेवून युवीनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅरेबियन संघाला १४४ धावांवर आटोपल्यावर हे आव्हान १३.२ षटकात पार करत संघाने सेमीच तिकीट पक्के केले. ही कसरत केल्यावर भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पाकिस्तानसोबत खेळावे लागणार आहे.
आता माघार घेतली तर पाकिस्तानला मिळेल फायनलचं तिकीट
साखळी फेरीतील सामना रद्द झाल्यावर दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण विभागून देण्यात आला होता. पण आता पहिल्या सेमीफायनलध्ये हे दोन संघच समोरासमोर आले आहेत. या परिस्थितीत जर भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला तर याचा फायदा घेत पाकिस्तान मॅच न खेळता थेट फायनलमध्ये खेळताना दिसू शकते.
कधी नियोजित आहे हा सामना?
WCL 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सेमीफायनलची लढत एजबॅस्टनच्या बर्मिंगहॅमच्या मैदानात नियोजित आहे. गुरुवारी ३१ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजता हा सामना सुरु होईल. याच दिवशी अन् याच मैदानात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी सेमीफायनल रंगणार आहे. २ ऑगस्टला बर्मिंगहमॅच्या मैदानात फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. गत हंगामात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत या स्पर्धाचा पहिला हंगाम गाजवला होता.