Join us  

"भारतात चांगलं क्रिकेट खेळू अन् वर्ल्ड कप पाकिस्तानात घेऊन येऊ", बाबरनं व्यक्त केला विश्वास

pakistan world cup squad : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ आज भारतात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 2:47 PM

Open in App

ICC World Cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ आज भारताच्या दिशेने रवाना होणार आहे. आगामी मोठ्या स्पर्धेपूर्वी कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषद घेत विविध बाबींवर भाष्य केले. खरं तर पाकिस्तानच्या संघात मोजकेच असे खेळाडू आहेत, ज्यांनी भारतीय भूमीवर क्रिकेट खेळले आहे. याबद्दल बोलताना बाबरने सांगितले की, भारतात खेळण्याचा कोणताही दबाव नाही. तेथील खेळपट्टीबद्दल जाणकारांशी चर्चा केली आहे, त्यांनी सविस्तर माहिती दिली असून भारतात फिरकीपटूंना मदत मिळते असे मी ऐकून आहे. त्यामुळे आम्ही कुठेही खेळण्यासाठी तयार आहोत. 

बाबरनं व्यक्त केला विश्वास५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. पाकिस्तानी संघ २९ सप्टेंबरला आपला पहिला सराव सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळेल. बाबर आझमचा संघ हैदराबादमध्ये ६ ऑक्टोबरला विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरूवात नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यातून करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. बाबरने आणखी सांगितले की, मी पाकिस्तानचं नेतृत्व करतोय ही एक अभिमानाची बाब आहे. नक्कीच आम्ही चांगलं क्रिकेट खेळू अन् वर्ल्ड कप पाकिस्तानात घेऊन येऊ. आशिया चषकात काय झालं त्यातून आम्ही शिकलो असून त्यावर चर्चा केली आहे. चुका कशा सुधारता येतील यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. 

पाकिस्तानी संघ विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात चौथ्या स्थानावर राहिल असे अनेकजण म्हणत आहेत. याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता बाबरने म्हटले, "नंबर चार हा चुकीचा क्रमांक आहे, आम्ही नक्कीच विश्वचषक जिंकू. पाकिस्तानी संघ नंबर ४ वर राहणार नाही याची मला खात्री आहे. माझा माझ्या १५ सदस्यीय संघावर पूर्ण विश्वास आहे आणि ते चोख कामगिरी पार पाडतील."

भारताविरूद्ध एकही शतक नाही...पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला भारताविरूद्ध वन डेमध्ये एकही मोठी खेळी करता आली नाही. याचाच दाखला देत बाबरला प्रश्न विचारला असता त्याने सावध उत्तर दिले. "मी कशी कामगिरी करतो याची पर्वा करत नाही. पण, मी नक्कीच माझं चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. मी भविष्यात भारताविरूद्ध काय करेन हे आता सांगू शकत नाही. मात्र होईल ते चांगलंच असेल असा मला विश्वास आहे", असे बाबरने स्पष्ट केले.

विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.

राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजमएशिया कप 2023