IND vs PAK Womens World Cup : पाकिस्तान क्रिकेटसाठी सध्या कुठलीही चांगली किंवा सकारात्मक घडताना दिसत नाहीये. पुरुषांच्या आशिया कपमध्ये अंतिम सामन्यासह तिन्ही सामन्यांमध्ये भारताकडून वाईट पराभव पत्करल्यानंतर, आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्येही पाकिस्तानी संघाची अवस्था वाईट झाली. पाकिस्तानी महिला संघाला या स्पर्धेत दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यातील दुसरा पराभव टीम इंडियाविरुद्ध झाला. पाकिस्तानच्या पराभवासोबतच आयसीसीने पाकिस्तानी संघाची स्टार फलंदाज सिद्रा अमीनलाही शिक्षा सुनावली. सामन्यादरम्यान तिने केलेल्या विचित्र कृत्याबद्दल सिद्राला ही शिक्षा मिळाली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला विश्वचषक सामना रविवारी, ५ ऑक्टोबरला कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. भारताने पाकिस्तानसमोर २४८ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तान या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि फक्त १५९ धावांवर गारद झाला. अनुभवी फलंदाज सिद्रा अमीनने एकट्याने किल्ला सांभाळायचा प्रयत्न केला होता. पण ८१ धावांची दमदार खेळी केल्यानंतर तीदेखील बाद झाली.
बाद झाल्यावर सिद्रा अमीनने केले विचित्र कृत्य
सिद्राचा डाव ४० व्या षटकात संपला. तिला भारतीय फिरकी गोलंदाज स्नेह राणाने बाद केले. सिद्रा तिच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली आणि तिचे शतकही हुकले. या दोन्ही कारणांमुळे तिची निराशा इतकी जबरदस्त होती की पाकिस्तानी फलंदाजाने पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी एक विचित्र कृती केली आणि त्याचा तिला फटका बसला.
सिद्रा अमीनने रागाने तिची बॅट जमिनीवर आपटली. ही कृती आयसीसीच्या नियमाचा भंग करणारी ठरली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, आज आयसीसीने एका प्रेस रिलीजमध्ये जाहीर केले की सिद्रा अमीनने आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केले आहे. हा प्रकार आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे किंवा मैदानावरील इतर उपकरणे आणि साहित्यांशी गैरवर्तनाशी संबंधित आहे. रागाच्या भरात बॅट आपटणे हे गैरवर्तन आहे. हा लेव्हल १ चा गुन्हा होता. मॅच रेफरीने सिद्रा अमीनच्या कृतीला लेव्हल १ चा गुन्हा घोषित केला आणि तिला फटकारले. लेव्हल १ च्या गुन्ह्यामुळे तिची मॅच फी कापली गेली नसली तरी, सिद्राला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला. तिने पुन्हा अशी कृती केली तर तिच्यावर सामना बंदीचीही कारवाई होऊ शकते.
Web Summary : Pakistani player Sidra Amin faced ICC punishment for violating conduct during the India match. Frustrated after her dismissal, she hit the ground with her bat, breaching ICC rules. Amin received a demerit point; further violations could lead to a ban.
Web Summary : भारत के खिलाफ मैच में पाकिस्तान की खिलाड़ी सिदरा अमीन को आचार संहिता का उल्लंघन करने पर आईसीसी ने सजा दी। आउट होने के बाद गुस्से में उन्होंने बल्ले को जमीन पर मारा, जो आईसीसी के नियमों का उल्लंघन था। अमीन को एक डिमेरिट पॉइंट मिला; आगे उल्लंघन होने पर प्रतिबंध लग सकता है।