Rachin Ravindra Serious Injured: लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र गंभीर जखमी झाला. कॅच पकडण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या चेहऱ्यावर आदळला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तबंबाळ झालेला रचिन रवींद्रला मैदानाबाहेर नेण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचान्यूझीलंडकडून पराभव झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये तिरंगी मालिका खेळवली जात आहे. पाकिस्तानशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही ही मालिका जिंकण्याच्या शर्यतीत आहेत. अशातच शनिवारी पाकिस्तानच्या डावाच्या ३८व्या षटकात रवींद्रच्या चेहऱ्यावर जोरात चेंडू लागला. खुशदिल शाहने डीपमध्ये शॉट खेळला. रचिनने तो पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातातून चेंडू निसटला. त्यानंतर चेंडू त्याच्या चेहऱ्यावर जोरात लागणा आणि तो रक्ताच्या धारा सुरु झाल्या. चेहऱ्यावरून पाण्यासारखं रक्त पडू लागलं.
खुशदिल शाहचा शॉट एकदम सपाट होता. मागे प्रेक्षक असल्यामुळे रचिनला चेंडूला पकडता आला नाही. चेंडू आदळल्यानंतर संपूर्ण स्टेडियम शांतता पसरली होती. त्यानंतर लगेच फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी रवींद्रवर उपचार सुरु केला. रचिन रवींद्रला तोंडाला टॉवेल गुंडाळून मैदानाबाहेर नेण्यात आले.
न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्र याला विचित्र दुखापतीनंतर क्रिकेट चाहत्यांनी खराब दर्जाच्या लाईट्ससाठी पीसीबीवर टीका केली आहे. पीसीबीने मैदानातील लाईट्सची गुणवत्ता सुधारावी. खराब लाईट्समध्ये रचिन रवींद्रला चेंडूचा अंदाज आला नाही आणि तो त्याच्या डोळ्याजवळ लागला. तो लवकरच बरा होईल अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ६ बाद ३३० धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने अवघ्या ७४ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४८व्या षटकात २५२ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडने ७८ धावांनी विजय मिळवला.