Pakistan vs England, 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतही यजमान पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. रावळपिंडी कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान मुलतान कसोटीत लाज वाचवेल असे वाटले होते, परंतु इंग्लंडच्या यशस्वी डावपेचाने त्यांना कोंडीत पकडले. पदार्पणवीर अब्रार अहमदने ( ११ विकेट्स) गोलंदाजीनंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानला आशेचा किरण दाखवला होता. पण, ४० वर्षीय जेम्स अँडरसनने त्याला बाद केले आणि इंग्लंडच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर मार्क वूड व ऑली रॉबिन्सनने कमाल केली.
PAK vs ENG : जो रुटने ढाबे दणाणून टाकले, बाबर आजमला पाकिस्तानींनी 'झिम्बाब्वर' म्हणून हिणवले; Video viral
इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती केली. तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडला पाकिस्तानमध्ये कसोटी जिंकण्यात यश मिळाले. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ १७ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी खेळत आहे. अब्रारने पहिल्या डावात ७ विकेट्स घेताना इंग्लंडचा २८१ धावांवर गुंडाळला. पण, पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार बाबर आजम ( ७५) व सौद शकिल ( ६३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने २०२ धावांपर्यंत कशीबशी मजल मारली. इंग्लंडने दुसऱ्या डावात बेन डकेट ( ७९) चे अर्धशतक व हॅरी ब्रूकच्या १०८ धावांच्या जोरावर २७५ धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्सने ४१ धावांचे योगदान दिले.
इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ३५५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली. अब्दुल्लाह शफिक ( ४५) व मोहम्मद रिझवान ( ३०) यांनी चांगला खेळ केला, परंतु मार्क वूड व अँडरसनने त्यांचा अडथळा दूर केला. सौद शकिल ( ९४), इमाम-उल-हक ( ६०) व मोहम्मद नवाज ( ४५) यांनी संघर्ष सुरू ठेवला होता. पण, इंग्लंडने कमबॅक केले. सौद शकिलची विकेट वादाचा विषय ठरली. अब्रार अहमदने मार्क वूडच्या एका षटकात तीन चौकार खेचून पाकिस्तानच्या चाहत्यांना खूश केले. पण, १७ धावांवर अँडरसनने त्याला झेल देण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा डाव ३२८ धावांत गुंडाळून इंग्लंडने दुसरी कसोटी जिंकली. २२ वर्षांनंतर इंग्लंडने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"