PAK Captain Fatima Argues With Umpire After Muneeba Ali Controversial Run Out India : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सहावा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २४७ धावा करत पाकिस्तानच्या संघासमोर २४८ धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आपल्या डावातील चौथ्या षटकात पाकिस्तानच्या संघाने सलामीची बॅटर मुनीबा अलीच्या रुपात पहिली विकेट रनआउच्या रुपात गमावली. तिच्या विकेटनंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये नाराजी पाहायला मिळाली. कॅप्टन फातिमा सना तर थेट पंचांसोबत हुज्जत घालताना दिसली. हे सगळं यापेक्षा नळावरचं भांडण बरं, अशाच धाटणीतील होतं. इथं जाणून घेऊयात नेमकं काय घडलं अन् हुज्जत घालण्याचा प्रकार पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा करणारा कसा ठरला त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
पाकिस्तानची सलामी बॅटर क्रीज बाहेर जाऊन फसली, दीप्तीनं चपळाईनं साधला रन आउटचा डाव
पाकिस्तानच्या डावातील चौथ्या षटकात क्रांती गौड गोलंदाजी करत होती. या षटकातील अखेरच्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या मुनीबानं हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. तिचा हा प्रयत्न फसला अन् भारतीय संघातील खेळाडूंनी पायचितची अपिल केली. मैदानातील पंचांनी भारताचे अपील फेटाळत तिला नॉट आउट दिलं. चेंडू स्लिपमध्ये दीप्तीकडे गेल्यावर तिने चपळाईन स्टंपवर थ्रो मारला. मुनीबाची बॅट हवेत असल्यामुळे तिसऱ्या पंचांनी तिला रन आउट असल्याचा निर्णय दिला. पण ती मैदानातून बाहेर जायला तयार नव्हती. मुनीबा सीमारेषा न ओलांडता थांबली. पाकिस्तानची कर्णधार सीमारेषेलगत येऊन पंचासोबत हुज्जत घालताना दिसली.
पाकच्या ताफ्यातील रन आउटचं लव्ह अफेअर! बॅट हवेत त्यात नियम काय तेच माहिती नाही
पाकिस्तानचा पुरुष संघ असो किंवा महिला विचित्र पद्धतीने रन आउट होण्याची एक परंपराच या संघात चालत आलीये. बॅटरचा आळस अन् नियमाचा पत्ता नसणं या गोष्टीही या संघातील खेळाडूंबाबत सातत्याने पाहायला मिळाल्या आहेत. तीच गोष्ट पुन्हा एकदा दिसून आली. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना ही मनीबा क्रीजमध्ये असताना आउट कशी? यासाठी मॅच रेफ्रीसोबत हुज्जत घालताना दिसली. मग त्यांनी पाक कर्णधाराला MCC नियम ३०.१.२ नुसार रनआउट दिल्याचे स्पष्ट केले. या नियमानुसार, फलंदाज ‘रनिंग’ किंवा ‘डायव्हिंग’च्या स्थितीत नसल्यास आणि बॅट किंवा शरीराचा संपर्क जमिनीशी नसेल तर या परिस्थितीत फलंदाज रन आउट ठरतो. दीप्तीनं मारलेला चेंडू ज्यावेळी स्टंपवर लागला त्यावेळी पाक बॅटरची बॅट हवेत होती. आळसी वृत्ती त्यात नियम माहित नसताना विकेटवरून घातलेला गोंधळ हे म्हणजे नळावरचं भांडणं बरं असं म्हणायला लावणारेच ठरते.