जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने काल लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव केला. या सामन्यात जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणसेन त्यांचा मुलगा अंगदसोबत मुंबईच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात आली होती. जसप्रीत बुमराहने विकेट्स घेताच कॅमेरा संजना आणि अंगद यांच्याकडे केला. ही क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. अनेकांनी अंगदच्या हावभावांवर कमेंट केली, जी संजनाला आवडली नाही. संजनाने इंस्टाग्रामद्वारे आपला राग व्यक्त केला आहे.
लखनौविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने चार षटकांत २२ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. एका विकेटदरम्यान, संजना आणि अंगद सेलिब्रेशन करत असताना कॅमेरा त्यांच्यावर गेला. त्यानंतर काही वेळातच या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या. याबाबत संजनाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून संताप व्यक्त केला. आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी नाही, असेही तिने म्हटले.
संजनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी नाही. जसप्रीत बुमराह आणि मी नेहमीच अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. कारण इंटरनेट हे एक घृणास्पद आणि घाणेरडे ठिकाण आहे. अंगद आणि मी फक्त जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तिथे होतो. याव्यतिरिक्त दुसरे काहीच कारण नाही. आमचा मुलगा इंटरनेटवर व्हायरल झाला पाहिजे किंवा बातम्यांमध्ये झळकला पाहिजे, यात आम्हाला काहीही रस नाही, जिथे लोक अवघ्या ३ सेकंदांत अंगद कोण आहे? त्याची समस्या काय आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे? हे ठरवत आहेत.'
पुढे संजना म्हणाली की, 'अंगद फक्त अडीच वर्षांचा आहे. एखाद्या मुलाबद्दल ट्रॉमा आणि डिप्रेशन यांसारख्या शब्दांचा वापर करणे अत्यंत वाईट आहे. तुम्हाला आमच्या मुलाबद्दल काहीच माहिती नाही. आमच्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही. माझी विनंती आहे की, एखाद्याबद्दल बोलताना त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जगात प्रमाणिकता आणि दयाळूपणेला खूप महत्त्व आहे.'