आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद आणि यंदाच्या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ( PCB) नजम सेठी यांनी BCCI वर जोरदार टीका केली आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले असताना, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले की, भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआयने ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली आहे, तर पीसीबीला हायब्रिड मॉडेलमध्ये खेळायचे आहे. त्यानुसार भारताचे सामने वगळता अन्य देशांचे सामने पाकिस्तानमध्ये होतील, असा त्यांचा प्रस्ताव आहे.
Times Now ला दिलेल्या मुलाखतीत नजम सेठी यांनी BCCI व जय शाह यांच्यावर टीका केली आहे. "आम्ही अजूनही वाटाघाटीच्या टप्प्यात आहोत. जय शाह यांच्याकडून आम्हाला अद्याप काहीही उत्तर मिळालेले नाही. आम्ही अजूनही त्यांच्याशी चर्चा करत आहोत. आम्ही काही अडचणींवर मात केली आहे. ही समस्या भारताची आहे, कारण पाकिस्तानने खेळण्यास नकार दिलेला नाही. भारत-पाकिस्तान फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये किंवा बहुपक्षीय सामन्यांमध्ये खेळतात, परंतु भारताने नकार दिल्याने कोणतिही द्विपक्षीय मालिका होत नाही. आशिया चषकाचे यजमानपद यंदा आमच्याकडे आहे आणि . आम्हाला आशा होती की ACC ठिकाणाच्या मुद्द्यांवर आमचा सल्ला घेईल,''असे सेठी म्हणाले.
"आम्ही तटस्थ ठिकाणी खेळावे अशी जय शाहची इच्छा आहे, परंतु यजमान म्हणून आम्हाला ही स्पर्धा पाकिस्तानात व्हायला हवी. सुरक्षेचा कोणताही प्रश्न नाही. जर भारत पाकिस्तानमध्ये आला तर आम्ही वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येऊ. आम्ही पाकिस्तानमध्ये चार सामने खेळतो, आणि नंतर आम्ही तटस्थ ठिकाणी जातो आणि उर्वरित सामने तेथे खेळतो, ज्यात अंतिम सामना देखील असतो. जर तोडगा अंमलात आला, तर वर्ल्ड कप कोणत्याच अडचणीशिवाय होईल," असेही सेठी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "पाकिस्तानमधील परिस्थिती ठीक आहे. गेल्या चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू आहे. दिल्ली आणि इतरत्र दंगली होत होत्या, त्यामुळे ते असुरक्षित नव्हते का? पाकिस्तानमध्ये काही अडथळे आहेत, पण मला आशा आहे की सप्टेंबरमध्ये परिस्थिती चांगली होईल."