सलामीवीरांकडून धडाका अपेक्षित, आज चौथा टी-२० सामना : भारताचा विंडीजविरुद्ध बरोबरीचा निर्धार

भारतीय संघासाठी फलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय ठरते. सूर्याला मागच्या सामन्यात निर्धास्त फटकेबाजी करताना पाहणे सुखावह ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 05:46 AM2023-08-12T05:46:50+5:302023-08-12T05:46:59+5:30

whatsapp join usJoin us
Openers expect blast, 4th T20 match today: India to draw against West Indies | सलामीवीरांकडून धडाका अपेक्षित, आज चौथा टी-२० सामना : भारताचा विंडीजविरुद्ध बरोबरीचा निर्धार

सलामीवीरांकडून धडाका अपेक्षित, आज चौथा टी-२० सामना : भारताचा विंडीजविरुद्ध बरोबरीचा निर्धार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉडेरहिल : टीम इंडियाला वेस्ट इंडीजविरुद्ध शनिवारी येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टी-२० लढतीत सलामी जोडीकडून धडाकेबाज सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधण्याचा निर्धार कायम आहे. विंडीजने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले होते. भारताने तिसरा सामना जिंकला तरी यजमान संघ अद्याप २-१ ने आघाडीवर आहे.  

 भारतीय संघासाठी फलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय ठरते. सूर्याला मागच्या सामन्यात निर्धास्त फटकेबाजी करताना पाहणे सुखावह ठरले. तिलक वर्मानेदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले; पण सलामी जोडीचे सलग तिसऱ्यांदा अपयश चव्हाट्यावर आले. ईशानला विश्रांती देत यशस्वी जैस्वालला टी-२० पदार्पणाची संधी देण्यात आली होती. सुरुवातीच्या दोन सामन्यांत ईशान-गिल यांनी क्रमश: पाच आणि १६, तर तिसऱ्या सामन्यात यशस्वी-गिल यांनी सहा धावा काढल्या. यामुळे मधल्या फळीवर दडपण येते. आता ईशानचे पुनरागमन होणार का, हे पाहावे लागेल. ‘करा किंवा मरा’ सामना असल्याने सलामीवीरांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. 

तळाचे फलंदाज अडखळतात, याची जाणीव असल्याने आघाडीच्या फलंदाजांकडूनच धावांची अपेक्षा बाळगता येईल. संतुलन साधण्यासाठी अक्षर पटेल याला सातव्या स्थानावर ठेवण्यात आले. यामुळे पाच गोलंदाजांची रणनीती कायम असेल. कुलदीपने तिसऱ्या लढतीत जे योगदान दिले, त्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. 

 विंडीजचा फलंदाज निकोलस पूरन हा भारतासाठी डोकेदुखी ठरला; पण कुलदीपने त्याला संधी न देताच माघारी धाडले होते. मागच्या सामन्यात तिन्ही फिरकीपटू  कुलदीप, अक्षर, युजवेंद्र चहल यांनी मैदान गाजविले. चौथ्या सामन्यातही त्यांच्याकडून कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे.
 सामन्याच्या सुरुवातीला येथील खेळपट्टी फलंदाजांना पूरक असते; पण खेळ पुढे  सरकत गेला की, ती मंद पडते. येथे सुरुवातीला फलंदाजी करणारे संघ १३ पैकी ११ सामन्यांत विजयी ठरले. 
 वेस्ट इंडीज संघ २०१६ नंतर भारतावर पहिला मालिका विजय नोंदविण्याची संधी सोडणार नाही. त्यामुळे सांघिक कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

Web Title: Openers expect blast, 4th T20 match today: India to draw against West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.